रस्ते हरित करण्यासाठी जय हिंद फाऊंडेशनची मोहीम
जय हिंद फाउंडेशन व एस.बी.आय. क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयाचा देशी वृक्ष लागवडीचा उपक्रम
नगर – माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशन व क्षेत्रीय प्रबंधक कार्यालय एस.बी.आय. च्या माध्यमातून उदरमल-कोल्हार रस्त्याच्या दुतर्फा 700 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. जय हिंदच्या माध्यमातून जिल्हाभर वृक्षरोपण व संवर्धन मोहिम सुरु असून, या उपक्रमांतर्गत वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले.
वृक्षरोपण करुन या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी उदरमलचे सरपंच यशोफ भिगारदिवे, अशोक आव्हाड, भगवान आव्हाड, किसन आव्हाड, जय हिंदचे शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, उपसरपंच गोरक्ष पालवे, बाळासाहेब पालवे, सोमा मिसाळ, चंदू नेटके, अप्पा गर्जे, लखन पालवे, महादेव पालवे आदी उपस्थित होते.
शिवाजीराजे पालवे म्हणाले की, उदरमल घाट ते कोल्हार रस्ता हिरवाईने नटणार असून, या दृष्टीकोनाने वृक्षरोपण करण्यात आले आहे. उन्हाळ्यात रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना मोठी सावली मिळणार आहे तर पर्यावरण संवर्धन देखील होणार आहे. डोंगर रांगा, माळरानसह उजाड रस्ते देखील हरित करण्याचे कार्य जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर वृक्षरोपणासाठी एस.बी.आय. ने केलेल्या सहकार्याचे कौतुक केले.
शिवाजी गर्जे यांनी बँकिंग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यातही बँकेचा हातभार कौतुकास्पद असल्याचे सांगितले. आभार अशोक आव्हाड यांनी मानले. एस.बी.आय. बँकेच्या वतीने जय हिंदच्या वृक्षरोपण अभियानाला तीन हजार झाडे देण्यात आली आहे. फाऊंडेशनच्या वतीने विविध ठिकाणी या झाडांची लागवड करण्यात येत आहे. उदरमल-कोल्हार रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या सर्व झाडांची काळजी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.