अहमदनगर

डॉ. भाकरे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे यांना अधिष्ठाता (कृषी) या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

डॉ. भाकरे यांनी 1999 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून मृद विज्ञान या विषयातील पीएच डी ची पदवी संपादन केली आहे. कृषी विद्यापीठातील त्यांना विविध पदांचा 38 वर्षाचा अनुभव असून त्यांनी नियंत्रक तसेच पदवीत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता म्हणून अतिरिक्त पदभार सांभाळलेला आहे. त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय परिसंवाद, पाच राष्ट्रीय परिसंवाद व दोन राज्यस्तरीय परिसंवादाचे संयोजन सचिव म्हणून काम पाहिले आहे.

त्यांनी आतापर्यंत 19 एम. एस. सी. कृषी आणि पाच आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. राज्यस्तरीय तसेच विविध केंद्रीय समित्यांवर सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांचे आतापर्यंत 142 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियत कालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून 31 पुस्तके तसेच पुस्तकातील अध्याय प्रकाशित केली आहेत. डॉ. भाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी 45 संशोधन शिफारशी दिलेल्या आहेत. त्यांनी दूरदर्शन व आकाशवाणी या प्रसार माध्यमांवर 29 पेक्षा जास्त कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.

त्यांनी 70 पेक्षा जास्त शेतकरी मेळाव्यांचे आयोजन केले असून 66 पेक्षा जास्त शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करून 5000 पेक्षा जास्त शेतकरी व 550 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी 32 पेक्षा जास्त कृषिविषयक लेख वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध केले आहेत. त्यांना 1982 सालचा धुळे कृषी महाविद्यालयाचा उत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार मिळालेला असून उत्कृष्ट संशोधन लेख लिहिल्याबद्दल सात वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

याचबरोबर ऍग्रो केअर आयडॉल पुरस्कार, मृदगंध पुरस्कार, सन 2020 मध्ये स्व. वसंतराव नाईक कृषि प्रेरणा पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. इंडियन सोसायटी ऑफ सोईल सायन्स, नवी दिल्लीचे ते फेलो असून त्यांनी कौन्सिलर म्हणूनही काम केले आहे. या पदभाराबद्दल डॉ. भाकरे यांची विद्यापीठ स्तरातून अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button