लक्ष्मी उद्योग समूहाची यशाची कारकिर्द व नव्याने उभारी गौरवास्पद- राधाकृष्ण विखे पाटील
अध्यात्माची जोड असल्यास प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता -महंत रामगिरी महाराज
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीक्षेत्र सरालाबेट गोदाधामच्या माध्यमातून आशिर्वाद लाभलेल्या बाबासाहेब चिडे यांच्या लक्ष्मी उद्योग समुहाची यशाची कारकीर्द दिवसेंदिवस नव्याने उभारी घेताना पाहायला मिळत असल्याचे गौरवोद्गार राज्याचे महसूल, दुग्धविकास, जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष्मी पेट्रोलियमच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.
माळवाडगांवचे लोकनियुक्त सरपंच बाबासाहेब चिडे परिवाराच्या लक्ष्मी उद्योग समुहाचे भोकर सबस्टेशन जवळ श्रीरामपूर – नेवासा मार्गावरील लक्ष्मी पेट्रोलियम (जी.ओ) चा उद्घाटन सोहळा महंत रामगिरी महाराज, पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास आ.लहूजी कानडे, वैजापूरचे आ.रमेश बोरनारे, माजी आ.भाऊसहेब कांबळे, पंचमहलचे महाव्यवस्थापक चिरागभाई पटेल, भाजपाचे तालुकाध्यक्ष दिपक पटारे, माळवाडगांव सोसायटीचे चेअरमन गिरीधर आसने, पारनेरचे सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना विखे-पाटील म्हणाले की, लक्ष्मी उद्योग समुहाचे पुढाकाराने लक्ष्मी पेट्रोलियमचा हा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा गुरूवर्य महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने पाठिंब्याच्या भावना शुन्यातून विश्व निर्माण केलंय. बाबासाहेब चिडे यांनी दुग्ध प्रकल्पानंतर पेट्रोलियम प्रकल्पात पाऊस टाकलं आहे. हा आनंद गगनात मावेना. या आनंदाच्या भावनेने आयोजन भव्य केले आहे. दुधाचा व्यवसाय अडचणीच्या काळात सुरू केला, त्यातूनही मार्ग काढला. पंचमहल डेअरीचे सहकार्य आता त्यांना मिळत आहे. जिल्ह्यात पंचमहलचा पाया भक्कमपणे उभा करणारे स्व.चौरे यांची आठवण होते. सात आठ लाख लिटर संकलन पंचमहल अमुलला मिळवून सहकार्य केले. हा व्यवसाय अडचणीचा आहे. यातून बाबासाहेब यांनी शिक्षण कमी असताना चिकाटी, सातत्य व जिद्दीने कुटुंबासमवेत मार्ग काढले. त्यांची घौडदौड पाहून आपल्या सारख्याचे मन आनंदाने भरून येते. शेतकरी, बहुजन व सर्वसामान्य कुटुंबातील तरुण प्रगती करू शकतो. मनापासून शुभेच्छा देत त्यांच्या प्रगतीचा आदर्श इतरांनी घ्यावा असे शेवटी विखे-पाटील म्हणाले.
महंत रामगिरी महाराज यांनी आपल्या आशिर्वादपर वाणीतून बोलताना कुठलाही व्यवसाय करत असताना सेवाभाव वृत्ती असावी ती बाबासाहेब चिडे यांच्यात आहे, याला कारण अध्यात्माची जोड, अध्यात्मात प्रतिकुल परिस्थिवर मात करण्याची क्षमता असल्याचे प्रतिपादन व्यक्त केले. याठिकाणी लक्ष्मी पेट्रोलियम या रिलायन्स कंपनीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पंपाचा शानदार असा उद्घाटन सोहळा संपन्न होत आहे. आयोजक बाबासाहेब चिडे परिवार सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्यापासून सराला बेटाशी जोडलेला आहे. बाबासाहेबांनी दुग्ध व्यवसायात अनेक अडचणींवर मात करत यशस्वी मार्गक्रम केले. अडचणी आल्या नाही तर प्रगती होत नाही. या दुग्ध व्यवसायातून त्यांनी बंधू सुरेश, चिरंजीव रोहीत यांच्या सहकार्याने बदलत्या काळानुसार सी एन जी, हायट्रोजन टेक्नॉलॉजी असलेल्या रिलायन्स पेट्रोलियम व्यवसायात यशस्वी पदार्पण केले. व्यवसायात अडचणी आल्या अन् अध्यात्मिक जोड असेल तर मनुष्य व्यसनाधीन व वाम मार्गापासून वाचतो. असाच एक कठीण प्रसंग दुग्धव्यवसायात त्यांच्यावर कुणामुळे कशामुळे आला होता. त्यातून सावरत खंबीरपणे व्यवसायाची वाटचाल सुरू ठेवली. बेटाचा आशिर्वाद बाबासाहेबांच्या परिवाराच्या पाठिशी असून त्यांच्या बेटाच्या सदैव सेवाभाव वृत्तीमुळे आम्ही त्यांना सद्गुरू गंगागिरी महाराज ट्रस्ट मध्ये विश्वस्त म्हणून घेतले असल्याचे शेवटी महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना आयोजक बाबासाहेब चिडे म्हणाले की, छोट्या लक्ष्मी किराणा नंतर ८० लिटर दुध संकलनास सुरूवात केली. अडचणीच्या काळात २०’वर्षापूर्वी छोटेसे रोपटे लावले. प्रारंभी गोदावरी खोरे चे राजेश परजणे यांची मोलाची साथ मिळाली. चंद्रशेखर कदम यांचे सहकार्य सद्गुरू नारायणगिरी महाराज, गुरूवर्य रामगिरी महाराज यांचे आशिर्वाद कायम पाठिशी असल्याने त्यांनी मला उभारी दिली. तमाम दुध उत्पादक, लहान भाऊ सुरेश यांचे मोलाची सहकार्य, चिरंजीव रोहीत याने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन सांभाळले आहे. तरूणांनी जिद्द, चिकाटी व धीर धरल्यास यश दूर नाही असे आवाहन त्यांनी तरूणांना केले. नामदार राधाकृष्ण विखे-पाटील, गुरूवर्य रामगिरी महाराज यांच्यासह आमदार महोदय सर्व अतिथी बंधू भगिनी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविलयाबद्दल आभार मानतो. यावेळी माजी आ. चंद्रशेखर कदम, आमदार लहुजी कानडे, आमदार रमेश बोरनारे, पंचमहलचे महाव्यवस्थापक चिरागभाई पटेल, रिलायन्सचे व्यवस्थापक निखील झंवर यांनी मनोगतातुन शुभेच्छा व्यक्त केले.
या कार्यक्रमास देवळालीचे माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, साई आदर्शचे संस्थापक शिवाजीराव कपाळे, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, नानासाहेब पवार, ज्ञानेश्वर मुरकुटे, शरद नवले, विठ्ठल राउत, ज्ञानेश्वर काळे, प्रांत अधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, ग्रामस्थ, दुध उत्पादक व चिडे परीवारावर प्रेम करणारा मिञपरीवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.