कृषी

भविष्यातील हरितक्रांतीसाठी मधूक्रांती गरजेची – बी. आर. मुंढे

नॅशनल बी बोर्ड द्वारे माळेवाडी येथे सात दिवसीय मधमाशी कार्यशाळाची सांगता
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अमर्याद कीटकनाशके फवारून मानव जात विनाशाकडे वाटचाल करत आहे. बऱ्याचदा किटकनाशकांमध्ये किटकांना आकर्षित करणारे केमिकल असतात. त्यामुळे उपयोगी कीटक जसे की मधमाशी सुद्धा आकर्षित होते व मरते. आपण, सर्व मानवजात ज्या फांदीवर बसलोय, तीच फांदी तोडत असल्याने भविष्यातील हरितक्रांतीसाठी मधूक्रांती गरजेची आहे असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा ग्रामउद्योग अधिकारी बी. आर. मुंढे यांनी केले.
भारत सरकारच्या राष्ट्रीय मधमाशी व मध मिशन अंतर्गत माळेवाडी ता. श्रीरामपूर येथे नॅशनल बी बोर्ड प्रायोजित सात दिवसीय स्टिंगलेस मधमाशी पालन कार्यशाळेच्या सांगता व प्रशस्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पालन पोषण हा गुण उपजतच महिलांमध्ये असल्याने मधमाशी पालनामध्ये विदेशातील महिला चांगले काम करत आहेत, त्यांच्या पुढे जाऊन भारतीय ग्रामीण महिला अविश्वसनीय कामगिरी करतील असा विश्वास कार्यक्रमाच्या अध्यक्षा भोकर येथील आशांकुर संस्थेच्या संचालक सिस्टर प्रिस्का तीर्की यांनी व्यक्त केला.
यावेळी आत्मा विभागाच्या ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी सौ. बढे यांनी एकूणच ग्रामीण महिला व ग्रामस्थांसाठी अन्न प्रक्रिया उद्योगात सरकारच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी मॅनेज हैदराबाद अंतर्गत एशियन ऍग्रीटेकच्या ऍग्री क्लीनिक व ऍग्री बिझनेस प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक अधिकारी संतोष वाघमारे यांनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावांमधील 15 शेतकरी तसेच पुणे, मुंबई, परभणी या ठिकाणाहून आलेले 10 असे एकूण 25 प्रशिक्षणार्थी यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली.
यावेळी सेंद्रिय शेती पुरस्कर्ते व विक्री व्यवस्थान तज्ञ राधाकिसन गुळवे उपस्थित होते, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनासाठी सौ. सुनीता थोरात, किशोर थोरात व माळेवाडी ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. सूत्रसंचालन गोदागिरी फार्म्सचे ऋषीकेश औताडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मिणनाथ शेपाळ यांनी केले.

Related Articles

Back to top button