अहमदनगर

छावाची जिल्हा कार्यकारणी बरखास्त

अहमदनगर – जिल्ह्यातील अखिल भारतीय छावा संघटनेची जिल्हा स्तरीय बैठक अहमदनगर शासकीय विश्राम गृह येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे हे होते. या बैठकीत छावाची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रमुख नितीन पटारे यांनी दिली आहे.
या बैठकीत मार्गदर्शन करतांना जिल्हा प्रमुख नितीन पटारे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका कार्यकारणी तीन वर्षांपूर्वी अ.भा.छावा संघटनेचे संस्थापक कै.अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या आशिर्वादाने व केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्या आदेशाने तयार करण्यात आली होती. संघटनेच्या नियमानुसार दर तीन वर्षांनी कार्यकारणी बरखास्त करून नवीन सदस्यांना काम करण्यासाठी संधी देण्यात येत असते. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे व विधार्थी प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे यांच्या आदेशाने अ.भा.छावा संघटना नगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याचे सांगितले.
नवीन कार्यकारणी सोमवार दि. 26 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अ.भा.छावा संघटनेच्या ध्येय धोरणाला धरून नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. यावेळी नविन सभासद नोंदणी करणे, संघटनेच्या योगदानानुसार कार्यकारणीत पद वाटपासाठी चर्चा करुन निर्णय, विद्यार्थी आघाडी, कामगार अघाडी, वाहतुक अघाडी, शेतकरी अघाडी, युवक आघाडी, महिला अघाडी नव्याने निर्माण करणे, प्रत्येक तालुक्यात नविन शाखा उघडून गाव तिथे अ.भा.छावा संघटनेची शाखा हा उपक्रम राबवून तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडविणे, नविन जिल्हा कार्यकारणी तयार करुन पुढील आंदोलने, कार्यक्रमाची दिशा ठरविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात बोलतांना जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की, नगर जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. गेल्या तीन वर्षात जिल्हा प्रमुख नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अ.भा.छावा संघटनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून कष्टकरी, विद्यार्थी, अभियंता यांना न्याय देण्यात यशस्वी झालो आहोत. जिल्ह्यामध्ये अ.भा.छावा संघटनेचे वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अ.भा.छावा संघटनेकडे युवकांचा कल वाढलेला आहे. आपली संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्यामुळे कोणाचीही भीड न बाळगता सर्वसामन्यांचे प्रश्न सोडवत आलेली आहे. संघटना बांधणी करून येणारे अखिल भारतीय छावा संघटनेचे अधिवेशन नगर जिल्ह्यात घेण्यासाठी केंद्रीय कार्यकारणीकडे मागणी केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या बैठकीस नितीन पटारे, देवेंद्र लांबे, अविनाश सातपुते, दादा बडाख, बहिरनाथ गोरे, प्रवीण देवकर, अमोल वाळुंज, शरद बोंबले, गणेश धुमाळ, किरण उघडे, भाऊसाहेब वाडेकर, गणेश गायकवाड, सुभाष मोरे, शैलेश धुमाळ, उमेश नवघरे, सुहास निर्मळ, क्षीरसागर ज्ञानेश्वर, संतोष कोल्हे, संतोष कुटे, निलेश बनकर, अक्षय पटारे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button