महाराष्ट्र

राजधानी शृंगारपुरात महाराणी येसूबाईंचे भव्य स्मारक व्हावे – शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के

शृंगारपुरकरांनी शंभुपत्नी येसुबाईंच्या वंशजांची घेतली भेट; शृंगारपूर भेटीचे राजेशिर्केंना निमंत्रण
पुणे : कोकणातील मौजे शृंगारपूर, तालुका – संगमेश्वर, जिल्हा – रत्नागिरी येथील समस्त ग्रामस्थांकडून “ऐतिहासिक प्रचितगड निसर्गरम्य शृंगारपूर” २०२३ या प्रसिद्ध दिनदर्शिकेचे पुण्यात नुकतेच २७ डिसेंबर २०२२ रोजी स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराजे शिर्के तसेच युवराज्ञी शंभुपत्नी महाराणी येसूबाईंच्या प्राचिन शृंगारपूर घराण्यातील राजेशिर्के घराण्याचे वंशज व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, शंभुसेना प्रमुख दिपकराजे गणपतराव शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 
प्रकाशना प्रसंगी पुढे बोलताना शिर्के म्हणाले की, ऐतिहासिक राजे शिर्के घराण्याची प्राचीन राजधानी असलेल्या शृंगारपुरात महाराणी येसूबाईंचा जन्म झाला, बालपण गेले, जिथे त्यांनी छत्रपती शिव-शंभुराजांनी घडवलेले स्वराज्य सांभाळण्याचे योग्य संस्कार, शिक्षण घेतले. त्या पवित्र शौर्यभूमीत महाराणी येसूबाईंसह पिता श्रीमंत पिलाजीराजे शिर्के व शूरवीर बंधूंराजांचे स्मारकं झालीच पाहिजे. ती निर्माण करण्यासाठी मी स्वतः समस्त शृंगारपूर करांसोबत असल्याचे स्पष्ट मत शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांनी व्यक्त केले.
सह्याद्री कोकण अर्थात शिरकाण प्रदेशात मौजे शृंगारपूर, तालुका – संगमेश्वर, जिल्हा – रत्नागिरी हे गाव छत्रपती संभाजी महाराजांची सासुरवाडी असून राजे शिर्के घराण्याची लेक युवराज्ञी जिऊ म्हणजेच शंभुपत्नी महाराणी येसूबाई सरकार यांचे माहेर आहे. प्राचीन काळापासून शृंगारपूर हे ठिकाण ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याच्या स्वराज्याची राजधानी होती. अशा पावन भूमीतून दिनदर्शिका प्रकाशित करण्यासाठी शृंगारपुरकरांनी शंभुसेना प्रमुख दिपकराजे शिर्के यांची भेट घेत स्मारकासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
प्राचीन काळापासून मूळ शृंगारपुर मध्ये वास्तव्यास असलेले परंतु इ.सन २ फेब्रुवारी १६८९ रोजी घडलेल्या ऐतिहासिक गनिमी काव्याच्या स्थलांतरित घडामोडीनंतर महाराणी येसूबाई यांच्या रक्ताच्या नात्यातील सर्व शिर्के मंडळी शृंगारपुरातून गनिमी स्थलांतर, वेषांतर करत शंभुराजांना सोडवण्यासाठी मौजे पेडगाव, तालुका – श्रीगोंदा, जिल्हा – अहमदनगर येथील किल्ले धर्मवीर गडा (बहादूरगड) पर्यंत आले. आज मितीस पेडगाव किल्ल्या नजीक स्थायिक झालेले दिसत आहेत. याच राजे शिर्के घराण्याच्या वंशजा कडून दिनदर्शिका प्रकाशित करण्याची अनेक दिवसांपासून ग्रामस्थांनी इच्छा व्यक्त केली होती. 
त्याप्रमाणे शृंगारपुर ग्रामस्थांनी महाराणी येसूबाईंच्या माहेरगावी शृंगारपूर येथे चिरकाल स्मरण व्हावे म्हणून येसूबाईंचे स्मारक होण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर समस्त शृंगारपुर करांसमवेत चर्चा करून पुढील नियोजन आखण्यासाठी दिपकराजे शिर्के यांना निमंत्रण ही देण्यात आले. शृंगारपुरकरांचे गाव भेटीचे निमंत्रण दिपकराजे शिर्के यांनी तात्काळ स्वीकारत पुढे बोलताना ग्रामस्थांना शब्द दिला की, माझे व शृंगारपूरचे प्राचीन काळापासून रक्ताचे नाते असून ते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी मी व माझ्या पेडगावच्या समस्त शिर्के परिवाराकडून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शक्य होईल ती मदत करेल व राणी येसूबाई साहेबांचे स्मारक होण्याकामी आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मागणी करेल असा ग्रामस्थांना विश्वास बोलून दाखवला.
प्रकाशन सोहळ्यासाठी पुणे येथील राजेशिर्के यांच्या लोहगाव संस्थेत शृंगारपूरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सुभेदार हरीदादा म्हस्के, मनेश म्हस्के, प्रमोद बिर्जे, गणेश म्हस्के, दिलीप म्हस्के, प्रविण म्हस्के, तेजस म्हस्के आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समस्त शृंगारपुर करांनी दिपकराजे शिर्के यांचा सत्कार केला. तसेच सैनिक सेलचे सरचिटणीस बाबासाहेब जाधव, चंद्रकांत ढेंबरे, चंद्रकांत गायकवाड यांनी ही शृंगारपुर वासियांचा सन्मान केला. कार्यक्रमास अनेक पदाधिकारी, प्रशिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button