ठळक बातम्या

फ-या व लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपयोजना करा – सरपंच जनार्दन घोगरे पाटील; मुख्यमंत्र्यांसह पशुसंवर्धनमंत्री व विरोधीपक्ष नेत्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

लोणी : अहमदनगर जिल्ह्यातील जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात फ-या व लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना होण्यासाठी लोणी खुर्द चे सरपंच जनार्दन घोगरे यांनी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांना ई- मेल द्वारे निवेदन दिले असुन त्या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी अ.नगर यांनाही ई- मेल द्वारे पाठवल्याची माहिती घोगरे यांनी दिली.
या निवेदनात सरपंच घोगरे म्हणाले की, जिल्ह्यात जनावरांवर मोठे महासंकट कोसळले असुन फ-या व लंम्पी रोगाने मोठे थैमान घातलेले आहे. या जनावरांवरील आजाराने शेतकरी मोठ्या संकटात सापडला असुन चिंतेत आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठा आमच्या लोणी खुर्द गावातील जनावरांचा बाजार फ-या व लंम्पी रोगाच्या फैलावामुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
जनावरांवर आलेला फ-या व लंम्पी रोगाचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने लसीकरण होणे क्रमप्राप्त आहे. अद्याप लसीकरणासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांची संसार हे गाय, म्हैस यांच्या दुग्ध व्यवसायावर आहे. जर या आजाराचे थैमान रोखले नाही तर अनेक कुटुंब उध्वस्त होणार असुन ही परिस्थितीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
तरी जनावरांवर असलेल्या फ-या व लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ लसीकरणासारख्या उपाययोजना राबवण्यात याव्यात. ज्या शेतकऱ्यांच्या जनावरांवर फ-या व लंम्पी आजाराने ग्रस्त आहे. त्यांना शासनामार्फत औषधोपचार करावेत तसेज ज्या शेतकऱ्यांचे जनावरे फ-या व लंम्पी रोगाने दगावलेले आहे, त्यांचे तात्काळ पंचनामे करुन त्यांना नुसकान भरपाई देण्याचे आदेश व्हावे अशी मागणी निवेदनाद्वारे सरपंच जनार्दन घोगरे यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button