अहमदनगर

लोणी खुर्द ग्रामदैवत श्री दक्षिणमुखी मारुती मंदिर जिर्णोद्धार वर्गणीचा शुभारंभ

लोणी : लोणी खुर्द येथील ग्रामदैवत श्री दक्षिण मुखी मारुती मंदिर जिर्णोद्धार वर्गणी प्रारंभ नवरात्री उत्सवाच्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्या हस्ते ह.भ.प.वै. बाबुराव महाराज यांच्या आशीर्वादाने संजय जोशी यांनी पहिली वर्गणी पावती देऊन शुभारंभ केला. वर्गणी शुभारंभ झालेला असुन सर्व ग्रामस्थ भाविक यांनी आपआपल्या परीने सहकार्य करावे असे आवाहन सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांनी केले.
या ग्रामदैवताचा मंदिर जिर्णोद्धार ६४ वर्षापुर्वी सन १९५८ ला मा.आमदार चंद्रभान घोगरे पाटील यांनी ग्रामस्थांच्या सहभागातुन केला होता. बर्‍याच दिवसांपासून गावातील ग्रामस्थ व भाविकांची या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी मागणी होती. ही सगळी भावना लक्षात घेऊन सरपंच जनार्दन घोगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांच्या सहकार्यातुन हा मारुती मंदिर जिर्णोद्धार सुरु झालेला आहे. पंचक्रोशीतील एकमेव दक्षिणमुखी श्री मारुती मंदिर असल्याने शनिवारच्या दिवशी परिसरातील सर्वच गावातील भाविक व नागरिक मनोभावे श्रध्देने नतमस्तक होत असतात.
ग्रामदैवत दक्षिणमुखी मारुती मंदिराचा सभामंडप हा १५०० स्के फुट चा असुन त्यासाठी आकर्षक डिझाईन तयार करण्यात आली आहे. त्याचे बांधकाम ही प्रगतीपथावर असुन मंदिर काम हे घडीव दगड वापरुन केले जाणार आहे. मंदिराची उंची भव्य असुन जवळपास २३ फुट आहे. जमीनीपासुन पुर्णतः मंदिराचे दगड काम केले जाणार आहे. दक्षिणमुखी मारुती मुर्ती ही किमान सात फुट उंचीची भव्य असुन तिचे मुर्तीकाम राज्यस्थान मधील जयपुर येथे होणार आहे. मंदिरासाठी अंदाजित जवळपास ५० लक्ष ते ७५ लक्ष रुपये खर्च अपेक्षित आहे.
गावातील अनेक भाविकांची व नागरिकांची या दक्षिणमुखी मारुतीरायांवर प्रचंड श्रध्दा असल्याने जिर्णोद्धारासाठी आपआपल्या परीने मदतीचा हात पुढे करत आहे. प्रत्येकाच्या मनी हे मंदिर पूर्णत्वास जावं याकरिता ओढ आहे. गावातील अनेक भाविक बांधकामासाठी वस्तु स्वरुपात ( दगड, विट, वाळु, खडी, फर्शी, सिमेंट ) मनोभावे अर्पण करत आहे. ग्रामस्थ भाविक यांनी आपआपल्या परीने सहकार्य करावे असे आवाहन वर्गणी प्रारंभ वेळी सरपंच जनार्दन घोगरे यांनी केले आहे.
यावेळी श्रीकांत मापारी, दिपक घोगरे, रनजित आहेर, प्रवीण घोगरे, विलास घोगरे, प्रभाकर कोळगे, चंद्रकांत आहेर, राधु राऊत, धर्माधीकारी गुरु, आण्णा तुपे, बाबा कुरकुटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button