राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि गंगानदी खोरे व्यवस्थापन अभ्यास केंद्र, आयआयटी कानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शक तत्वे आणि धोरणे या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नवी दिल्ली येथे दिनांक 30 जून ते 1 जुलै, 2022 करण्यात आले होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक डॉ. अशोक शर्मा हे होते. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक आणि महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार, आयआयटी कानपूर येथील ई गंगा केंद्राचे संस्थापक डॉ. विनोद तारे, आंतर विद्याशाखा जलसिंचन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. महानंद माने, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आणि आयआयटी कानपूर येथील शास्त्रज्ञ ऑनलाईन माध्यमाव्दारे उपस्थित होते.
यावेळी डॉ. अशोक शर्मा मार्गदर्शन करतांना म्हणाले की शेतीकडे व्यावसायिक दृष्टीकोन म्हणून पाहिल्यास समाजातील आर्थिक आणि सामाजिक समस्या दूर होण्यास मदत होईल म्हणून शेतीमध्ये विविधीकरण घडवून आणणे गरजेचे आहे. याप्रसंगी डॉ. किरण कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रमोद रसाळ यांनी विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण आणि विस्तार या विषयाचा आढावा दिला. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेतीच्या घटकांबद्दल तसेच कृषि पध्दती, पारंपारिक, सेंद्रिय, नैसर्गिक आणि अचुक शेती तसेच विविध सरकारी कृषि धोरणे याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. विनोद तारे यांनी मान्यवरांचे स्वागत, परिचय आणि कार्यशाळेच्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी दिली. या कार्यशाळेत आतंरराष्ट्रीय जलव्यवस्थापन संस्थेचे मानद सदस्य आणि केंद्राचे प्रतिनिधी डॉ. अलोक सिक्का, आनंद कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एम. सी. वार्ष्णेय, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे डॉ. ए. के. सिंग, निती आयोगाचे डॉ. निलम पटेल या तज्ञांनी पारंपारिक शेती, नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, आधुनिक विज्ञान व उच्च तंत्रज्ञान शेतीविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि आयआयटी कानपूर सोबत कृषि महाविद्यालय, पुणे येथे सेंटर फॉर एक्सलन्स स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. प्रमोद रसाळ, डॉ. सुनिल गोरंटीवार, डॉ. विनोद तारे, डॉ. महानंद माने आणि डॉ. सुनिल कदम हे उपस्थित होते. या सामंजस्य करारामुळे स्थापन होणार्या सेंटरचा फायदा शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच उद्योजक यांची क्षमता वाढविणे आणि विपणनासाठी मदत करणे याचबरोबर शाश्वत आणि प्रगत अशा कृषि पायाभुत सुविधा विकसीत करण्यासाठी होणार आहे. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे व सामंजस्य कराराचे समन्वयक म्हणून कास्ट प्रकल्पाचे सर्व संशोधन सहयोगी यांनी काम पाहिले.
0 टिप्पण्या