कृषी

कृषि पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला भरीव निधी दिला जाईल – कृषि राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम

राहुरी विद्यापीठ : राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे शेतकर्यांसाठी केलेल्या महत्वपूर्ण संशोधनामुळे तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले या विद्यापीठातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी यामुळे प्रतिष्ठीत बनले आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कृषि क्षेत्रातील योगदान लक्षात घेता कृषि पंढरी समान राहुरी कृषि विद्यापीठाला संशोधनासाठी भरीव निधीची तरतुद केली जाईल असे प्रतिपादन राज्याचे कृषि राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात विद्यापीठ शास्त्रज्ञ सुसंवाद बैठकीला मार्गदर्शन करतांना कृषि राज्यमंत्री ना. डॉ. विश्वजीत कदम बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होते. याप्रसंगी फलोत्पादन राज्यमंत्री ना. कु. आदिती तटकरे, नगर विकास व उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे, आ. रोहीत पवार, आ. लहू कानडे, कार्यकारी परिषद सदस्य आ. नरेंद्र दराडे, संचालक संशोधन व विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम पुढे म्हणाले की सध्याचे हवामान बदल लक्षात घेता कृषि विद्यापीठांनी शेतकर्यांशी संवाद साधून त्यांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर सध्याची स्थिती लक्षात घेता सेंद्रिय शेतीच्या संशोधनावर भर देणे आवश्यक आहे. कृषि विद्यापीठांनी संशोधन बाबींवर पेटंटसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी आपले संशोधन हे उच्च दर्जाच्या जर्नल्समध्ये प्रकाशित करावे असे ते म्हणाले. याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण, प्रशासकीय व आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. यावेळी ते म्हणाले की कृषि विद्यापीठाचे कार्य सक्षमपणे चालवण्यासाठी प्राध्यापक व कर्मचारी यांच्या रिक्त जागा भरणे अत्यंत गरजेचे आहे.

यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या शुभहस्ते अतिवृष्टी पुरग्रस्तांसाठी विद्यापीठ कर्मचार्यांचा एक दिवसाचा वेतनाचा रुपये 39,88,082 रकमेचा धनादेश मख्यमंत्री निधीसाठी कृषि राज्यमंत्र्यांकडे सुपूर्त केला. बैठकीचे स्वागत व प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले. कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले. बैठकीला विद्यापीठाचे अधिकारी, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख व शास्त्रज्ञ उपस्थित होते. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांनी  उद्यानविद्या विभागाच्या प्रक्षेत्रावरील विविध फळपिकांचे प्रात्यक्षिक, औषधी व सुगंधी वनस्पती प्रकल्प, कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प आणि उद्यानविद्या रोपवाटीका या प्रकल्पांना भेटी दिल्या.

Related Articles

Back to top button