राहुरी पोलीस ठाण्याबरोबर निवासस्थानाची निर्मिती करा - सामाजिक कार्यकर्ते पवार

राहुरी : तालुक्यातील पोलीस ठाणे व पोलीस अधिकारी, अंमलदार, कर्मचारी यांच्यासाठी निर्माण केलेल्या वसाहतीची वाताहात झाल्याने पोलीस ठाण्याबरोबर त्यांच्यासाठी निवासस्थानाचीही नवनिर्मिती करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांकडे केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, राहुरी तालुक्याची परिस्थितीचा बघता भौगोलिक क्षेत्र १०१७०० हेक्टर असून लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ३,२२,८२३ आहे. राहुरी तालुक्यात २ नगरपालिका, ८२ ग्रामपंचायत असून ९६ महसूल गावे आहेत. येथून अहमदनगर- मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग गेला असल्याने जिल्ह्यातील श्री साईबाबा देवस्थान शिर्डी व श्री शनी शिंगणापूर देवस्थान दर्शनाकरिता राज्यातून व परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने प्रवास करत असतात. तसेच राहुरी तालुक्यातून नगर मनमाड मध्य रेल्वे मार्ग, मुळा धरण व महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. नेहमीच राहुरी कृषी विद्यापीठ येथे विविध उपक्रम सादर केले जातात. तेथे नियमित व्ही आय पी व्यक्तींचे महत्वाचे दौरे असतात. त्याचबरोबर परराज्यातून व राज्यातून हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत तालुक्यात वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्ह्याच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली आहे. राहुरी पोलीस स्टेशन येथे पोलीस वसाहत असून सदर वसाहतीमध्ये ५ पोलीस लाईन असून ४२ निवासस्थाने आहेत व प्रभारी अधिकारी याकरिता १ निवासस्थान आहे. 
सदर पोलीस लाईनचे काम हे १८८६ सालात झालेले आहे. सर्व पोलीस लाईन व निवासस्थाने मोडकळीस आलेली असुन इमारतीची पडझड झालेली आहे. येथील पाणी, वीज प्रश्न, ड्रेनेज व्यवस्था बंद आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने या सर्व इमारती राहण्यायोग्य नाही असा अहवाल दिलेला आहे. नवीन इमारत बांधण्यासाठी राहुरी नगरपालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशी सुत्रांकडून खात्रीशीर माहिती समजते. पोलीस स्टेशन येथे साधे शौचालय व मुतारी उपलब्ध नाहीत. या सर्व बाबी लक्षात घेता तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.

सध्या राहुरी पोलीस स्टेशन येथे १ पोलीस निरीक्षक, ४ स.पो.निरीक्षक, ८१ पोलीस अमलदार नेमणुकीस आहेत. निवासस्थाना अभावी सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे भाडोत्री खोल्या घेऊन राहतात तर काही मूळ गावी राहून येणे जाणे करतात. सारखा प्रवास, उपाधीक्षक कार्यालय श्रीरामपूर व अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे असल्याने प्रवास राष्ट्रीय महामार्गाने व सध्या राष्ट्रीय महामार्गाचे चालू असलेले काम, कामाचा ताण, प्रवासाचा त्रास व मानसिक तणाव कमी असलेले मनुष्य बळ कर्मचारी आज जीव मुठीत धरून राहत आहे. पोलिसांना त्यांच्या सुखसोई, सेवा पुरविणे कायद्याने बंधनकारक आहे. यादरम्यान च्या कालखंडात एखाद्या पोलीस अधिकारी अथवा पोलीस कर्मचारी यास दुखापत अथवा अपघात झाल्यास मनुष्य वधाचे गुन्हे संबधीतावर दाखल करण्यात येतील त्यामुळे आपण यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा सामाजिक हितासाठी जनतेच्या, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या हक्कासाठी नाइलाजाने मा. उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या