कनोसा वसतिगृहात महिला मेळावा उत्साहात साजरा

अहमदनगर/ जावेद शेख : महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर शिरसगांव येथील कनोसा वसतिगृहाच्या सुपिरियर सि. पाकुली यांनी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. असंख्य महिलांनी या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिपाली करण ससाणे, लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फा. ज्यो. गायकवाड, सेंट लूकच्या सि. फिलोमिना सि. जॅकलिन, ब्र. राहुल रणशूर, अशोक कारखान्याच्या संचालिका सौ. शीतल गवारे, सि. ऍनि, रवींद्र त्रिभुवन, सौ.सविता वाघमारे, खंडागळे गुरुजी, कनोसाच्या सुपीरियर सि. पाकुली व इतर धर्म भगिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात लोयोला धर्मग्रामातील महिला, तालुक्यातील विविध बचत गट, व शिरसगांव पंचक्रोशीतील महिलांनी सक्रिय सहभाग नोंदवत विविध सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृती पर गीते सादर केली.

सि.पाकुली यांनी शिक्षणाचे महत्त्व आणि व्यसनमुक्तीवर सादर केलेल्या गीतांनी विशेष दाद मिळविली. या मेळाव्यात सौ. सविता वाघमारे व रवींद्र त्रिभुवन यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना सविता वाघमारे म्हणाल्या की, जबाबदाऱ्यांचे ओझे वाहत असताना आजच्या आधुनिक स्त्रिया कुटुंब व्यवस्था नेटाने सांभाळत आहेत. नोकरी, व्यवसाय किंवा शेती सांभाळताना उत्तमपणे कुटुंब सांभाळत आहेत व कुटुंबाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील आहेत. कौटुंबिक सुखसंवाद व आजची स्त्री या विषयावर बोलताना सेंट झेवियर्स चे शिक्षक रवींद्र त्रिभुवन म्हणाले की, कुटुंबात होणारा सुखसंवाद कुटुंबाचा पाया आहे. पण बदलती सामाजिक परिस्थिती व जलद गतीने धावणारी जीवनशैली यामुळे कुटुंब भौतिक सुखाभोवती केंद्रित झाले आहे. पण कुटुंबव्यवस्था टिकवायची असल्यास पतीचा पत्नीशी, मुलांचा आई वडिलांशी, घरातील वडिलधार्‍यांशी, नातेवाईकांशी व शेजाऱ्यांशी सुखसंवाद होणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. दिपाली ससाणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांच्या स्त्री शक्ती ग्रुपच्या कार्याचा लेखाजोखा मांडला व कनोसाच्या सर्व बचत गटांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मेळाव्याचे औचित्य साधून कोरोना काळात आशा वर्कर म्हणून मोलाचे कार्य करणाऱ्या व नुकत्याच तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आलेल्या सौ. सविता पठारे, शबाना शेख व कोळगे यांचा इंदिरानगर परिसरातील नागरिक व कनोसा परिवाराच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुवर्णा बोधक यांनी केले तर प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सौ. नूतन सात्राळकर यांनी करून दिला. शेवटी उपस्थितांचे आभार कनोसाच्या सुपिरियर सि.पाकुली यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ.लता बनसोडे, सौ. सुवर्णा बोधक, सौ. नूतन सात्राळकर, सौ. सुनिता बनसोडे, जुबेदा शेख यांच्यासह अनेक महिलांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या