वाचन संस्कृती ही मराठी भाषेला समृद्ध करणारी चळवळ होय- सौ. कमलताई सोनजे

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी वाचन, लेखन चळवळ वाढली पाहिजे, यादृष्टीने श्रीरामपूरची वाचन संस्कृती प्रतिष्ठानची ही ग्रन्थ चळवळ प्रेरणादायी असल्याचे मत पुणे येथील मराठीच्या जेष्ठ लेखिका सौ. कमलताई उत्तमराव सोनजे यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने सौ.कमलताई सोनजे यांना सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्ताने सौ. सोनजे बोलत होत्या. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्तविक केले. आणि आपली विविध पुस्तके देऊन सन्मान केला तर बचत गटाच्या सौ.सुनंदा वाघमारे यांनी बुक, बुके देऊन लेखिका सौ. सोनजे यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला. महेश साळी यांना बुके व ग्रन्थ देऊन सन्मान केला. सौ.कमलताई सोनजे यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषा ही आपला आत्मप्रकाश असून तो सदैव तेवत ठेवायचा असेल तर वाचन, लेखन, चिंतन करून मराठीचे संरक्षण, संवर्धन केले पाहिजे. डॉ.बाबुराव उपाध्ये हे सातत्याने विविध उपक्रम ठेवून ही साहित्य चळवळ गतिशील करीत आहेत. त्यांची पुस्तके ही लोकप्रबोधन आणि मराठी भाषेला विकसित करणारी वाटचाल आहे. माझ्या अनेक पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या प्रस्तावना प्रेरणादायी आहेत. माझा निपाणी वडगावचा खाडे परिवार लेखन, वाचन संस्कृतीला बळ देणारा आहे. आमचे के.एल.खाडे यांचे लेखन संस्कार आम्हाला लाभले आहेत. सासरी गेल्यावरही लेखन करण्यास चांगले वातावरण लाभले. पुण्यात अनेक उपक्रमात सहभागी होता येते.

डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या 'फिरत्या चाकावरती ' या आत्मचरित्रांचा माझ्या मनावर प्रभाव निर्माण झाला. डॉ.उपाध्ये यांनी मला आत्मकथन लिहिण्यास प्रेरणा दिली. मराठी भाषा दिनी, कवी कुसुमाग्रज यांचा आदर्श जपत आपण मायमराठीला समृद्ध करूया ! असे सांगून त्यांनी हा साहित्य सत्कार म्हणजे मायबोलीचा सन्मान आहे. मी आता माझ्या शब्दांना बळ लाभले आहे, अशा भावना व्यक्त केल्या. सौ.सुनंदा वाघमारे यांनी सांगितले की आम्हाला डॉ.उपाध्ये यांचे पुस्तकालय आणि उपक्रम दिशादर्शक ठरतात असे सांगून माझ्या हस्ते मराठी भाषादिनी एका जेष्ठ लेखिकेचा गौरव झाला हे खूप समाधानाचे आहे असे सांगितले. सत्काराबद्दल महेश साळी यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या