पैठण : तालुक्यात कायमस्वरूपी तहसीलदार द्यावा या मागणीसाठी वारंवार शासकीय स्तरावर निवेदने व पाठपुरावा करुनही दखल घेतली जात नसल्याने अखेर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर सोमवार (दि.२१) पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
पैठण तालुक्यात कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने सर्वसामान्य जनतेची वेळेत कामे होत नाहीत. त्याच बरोबर भ्रष्टाचार होण्याची दाट शक्यता असल्याचे कारण देत तातडीने तहसीलदाराची नेमणूक करण्यात यावी. यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पैठण यांच्या वतीने कायमस्वरूपी महिला तहसीलदाराची नेमणूक करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, अप्पर मुख्य सचिव (महसूल), विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आदींना केली होती. अन्यथा उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. यावर १७ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांना मिळालेले विभागीय आयुक्त यांच्या पत्राचा तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या शब्दाचा मान ठेवून दि.२६ जानेवारी २०२२ रोजी होणारे उपोषण स्थगित केले होते.
मात्र, यासंदर्भात अद्याप कुठलीही दखल न घेतल्याने, तालुक्यात कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणूक करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अनिता वानखेडे यांनी आक्रमक पवित्रा घेत २१ फेब्रुवारी सकाळी दहा वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागणी मान्य केली जात नाही. तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. आता प्रशासन त्यांच्या मागणीला कितपत प्रतिसाद देईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
0 टिप्पण्या