राहुरी / मधुकर म्हसे : फळे व भाजीपाला उत्पादनात भारत अग्रेसर आहे. परंतू काढणीपश्चात हाताळणी, वाहतूक, साठवणूक अभावी 30 ते 40 टक्के भाजीपाला वाया जातो. फळे आणि भाजीपाला प्रक्रियेबाबत महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेले तंत्रज्ञान महिलांनी प्रशिक्षणातून अवगत करुन उद्योजक व्हाव्यात असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
कृषि विस्तार व संज्ञापन विभाग व पदव्युत्तर महाविद्यालय, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांचे वतीने भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारा अनुसुचित जाती उपघटक अनुदानित दोन दिवसीय फळे व भाजीपाला प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. अहिरे बोलत होते. याप्रसंगी कृषि विस्तार व सज्ञापन विभागाचे प्राध्यापक डॉ. गोरक्ष ससाणे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. ज्ञानदेव फराटे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. अहिरे पुढे म्हणाले की ग्राहकांच्या चवीप्रमाणे गोड, आंबट, तिखट अशा प्रकारचे लोणचे, टॉमॅटो सॉस, जॅम, जेली, केचअप, कॅन्डी इ. अनेक मुल्यवर्धीत प्रक्रियायुक्त फळे व भाजीपाल्याचे प्रकार शास्त्रीयदृष्ट्या बनविता येतात. त्यातून आर्थिक उत्पन्नाबरोबरच महिला सबलीकरण होते.
प्रशिक्षणाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानदेव फराटे यांनी केले. प्रशिक्षणास सडे, गोटुंबा आखाडा व परिसरातील महिला उपस्थित होत्या. प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. आनंद चवई यांनी केले. दोन दिवसीय प्रशिक्षणात सहयोगी प्रा. डॉ. विक्रम कड व काढणीपश्चात तंत्रज्ञान केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जितेंद्र ढेमरे यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभणार आहे. कार्यक्रमासाठी राजु राठोड, विश्वनाथ तोंडे व अनिल येवले यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या