आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक कवी दडलेला, लपलेला असतो, आणि म्हणूनच कधी ना कधी आपण एखादी का होईना, चारोळी का होईना, पण कविता केलेली असते. आजचा कट्ट्याचा विषय काव्य कट्टा.
कुठली नाही तर प्रेमाची चार वाक्य आपण खरडलेली असतात. आपण चांगले कवी की वाईट कवी, हा भाग वेगळा, पण आपण कवी असतो; आणि कविता केल्या पण पाहिजेत. कारण मुळात, कविता ही एकतर खूप दुःखात, खूप कल्पनेत किंवा प्रेमात पडल्यावर किंवा खुप आनंदाच्या वेळेस स्फुरते.
प्रत्येक महाविद्यालयात कविता करणाऱ्यांची कमतरता कधीच नसते. काही हौशी प्राध्यापक हे उत्तम कविता करतात. आपल्याकडे मराठी कवींची केवढी जंत्री आहे. अगणित काव्य आपल्याकडे लिहिले गेलेले आहे. साहित्यातला भक्तिकाल हा संपूर्णपणे काव्याने नटलेला आहे. कवीला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. प्रेमापासून तर महापुरुषांपर्यंत, केसाच्या बटांपासून गालावरच्या तीळापर्यंत, महाविद्यालयातल्या बाकड्यापासून तर कॅंटीनच्या वड्यापर्यंत, अभ्यासक्रमातील विषयांपासून सूर्या पर्यंत काहीही वर्ज्य नसतं आणि म्हणूनच या कवींना एक वेगळं महत्त्व महाविद्यालयात प्राप्त झालेले असत. कवी कट्ट्यावरची मुलं कायमच स्टेज गाजवत असतात. कट्टे गाजवत असतात. कधी वडाच्या झाडाखाली, कधी अभ्यासिकेत, कधी कॅन्टीनमध्ये यांच्या काव्य मैफिलीला रंग चढत जातो.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं सेम असतं. ही कवी मंगेश पाडगावकरांची कविता स्वतःची म्हणून ढापणारे पण काहीजण असतात. 'र' ला 'ट' जोडला मग यमक जुळलं. असं म्हणून एक होती पाल ती गेली नेपाल अशा काहीश्या थुकरट कविता काहीजण आपल्या माथी मारत असतात. किंवा तळं, तळ, तळ, दहा वेळा तळं तळं लिहायचं आणि शेवटी डुबुक म्हणून किती गर्भितार्थ कविता वगैरे आहे असे सांगणारे भेटतात.
कवीच कवित्व फुलतं ते याच महाविद्यालयीन वयात आणि म्हणूनच इतरांच्या कविता ज्याला उत्तम ऐकता येतात तोच कवी हा कवी कट्टा गाजवू शकतो. कवीला नेहमी असे वाटते की आपल्या कवितेचं गाणं व्हाव. जेव्हा कवितेचं गाणं होतं तेव्हा काव्यातल्या शब्दांना एक वेगळा सौंदर्याचा स्वर्ण रेखी साज चढतो हिऱ्याचा मुलामा असल्यासारखं हे काव्य चकाकत राहते. आपल्या कवितेचं गाणं होणे हे प्रत्येक कवीचे स्वप्न असतं. मला भावलेलं, आवडलेलं एक काव्य म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेलं, कवी ग्रेस यांचं कमालीचं गाजलेलं हे काव्य
ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता,
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता |
ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मीही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता |
अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता |
आपल्याकडे असंख्य कवींची नावे सांगता येतील किंवा त्यांच्या काव्यसंग्रहाची सुद्धा सांगता येतील. विशाखा, जिप्सी, चैत्रबन, गीत रामायणकार ग.दि.माडगूळकर यांनी मराठी कवितेला स्वर्गीय उंची गाठून दिली. चैत्रबन मधल्या अनेक कविता जसे एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक आणि शेवटी त्याची त्याला कळाले तो राजहंस एक,
कोलंबसाच्या गौरव गीतापासून पृथ्वी गीता पर्यंत आणि स्वातंत्र्याच्या 50 वर्षाच्या गितापर्यंत विशाखातील सर्व कविता, केशवसुतांच्या एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन मी ती स्वप्राणाने, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयोस्तुते किंवा सागरा प्राण तळमळला, गोलपिठा मधल्या नामदेव ढसाळांच्या कालचा पाऊस आमच्याकडे आलाच नाही अशा किती कविता, नारायण सुर्वे यांच्या तर कितीतरी..., शांता शेळके, बहिणाबाई, इंदिरा संत किती नावे सांगावीत अगदी बालकवींपासून तर आचार्य अत्र्यांपर्यंत; त्यामुळे लहानपणीच्या सगळ्या कविता आपल्याला पाठ असतात, त्या पाठ का होतात कारण ह्यात कवितांची गाणी झाली होती. खबरदार जर टाच मारुनी म्हणताना आजही अंगावर शहारे येतात किंवा
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
कोण माझ्या बोलले छकुलीला ...
अगदी बालपणीच्या
इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बायी उंचावरी... पासून आपल्या किती कविता पाठ असतात. त्या पाठ का होतात, कारण आपल्याला शिकवणारे कवी त्या तोडीचे होते, मला माहितीये मी जरा बालपणात रमलो पण आपल्यातल्या कवी जागा असतो आणि त्या कविला वाट मोकळी करून देता आली पाहिजे. कोणी वाचो वा न वाचो आपणच आपल्या कविता वाचाव्यात. सुरुवातीला आपण, दुसर्याला वाचायला देऊ दुसऱ्याच्या कविता वाचून कविता लिहीत राहा.
आमच्या आय कॉलेजमध्ये राहुल निकम, स्वाती राऊत, रोहित लोंढे, प्रा. बाळासाहेब पराडे यांच्या मार्गदर्शनाखाली कविता करायला सुरुवात केली. आज राहुल निकम स्टेज कार्यक्रम करतो. कवी राहुल निकम हा नव्या धाटणीच्या लावण्या करतो. तो निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध आहेच पण कॉलेज कट्टा मधून पुढे आलेला. अशा सगळ्यांची नावं इथे सांगणे केवळ अशक्य असलं, तरीसुद्धा ही वानगीदाखल उदाहरणे दिली आहेत.
माझी स्वत:ची 'र' ला 'ट' जोडत शब्दांशी झालेली चकमक खाली विस्तारतो आहे.
माझी कविता
ज्ञानियाची,
तुकयाची,
भक्तीकाळाची,
थोरल्या रायांच्या
स्वराज्याची,
जरी पटक्याची,
भगव्याची,
अहील्येची,
ताराराणीची,
फुले, शाहू ,आंबेडकरांची,.
काव्य फुलांची,
शाहिरी पोवाडा गाजवणारी,
माझी कविता स्वातंत्र्य संगराची,
मिठाच्या सत्याग्रहाची,
चलेजाव ची,
काव्यफुलांची,
ज्ञानपीठाची,
मराठीच्या मातीची,
अभिजात संगीताची,
साऱ्या साहित्याची,
माझी कविता
गात राहते
मनी,
डोंगरी नांदते,
गडगिरी करिते,
असते अर्धी कच्ची,
मिरावते पताका
माझीच,
माझ्याच मनात
गुणगुणत राहते..
कवीला कवितेची कळ यावी लागते, असे म्हणतात. ती आली, की ती मारू नये प्रसवून मोकळं व्हावं...
कवींना प्रोत्साहन देता आले पाहिजे. सुरुवातीला तोडक्या-मोडक्या शब्दात लिहिणारा कवी, त्यामध्ये गेयता आणून त्या काव्याचे गाणं होईपर्यंतचा कवी आपल्याला बघता आला पाहिजे.
चला तर कविता करूया...
कविता करणाऱ्यांना प्रोत्साहित करूयात...
प्राचार्य : कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर.
सदस्य : अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.
0 टिप्पण्या