अहमदनगर/ जावेद शेख : ऑनलाइन शिक्षण पद्धती समजावून घ्यावी. शिक्षण घेताना शैक्षणिक अभ्यासा बरोबरच आपल्या सुप्त गुणांना विकसित करावे व भरपूर परिश्रम घेऊन आपले ध्येय गाठावे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हाळगाव या महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन ओरिएंटेशन कार्यक्रमात महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी विद्यार्थी कल्याण कार्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. चारुदत्त चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना महाविद्यालयात शिक्षण घेत असताना कोण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, समुपदेशकाचे महाविद्यालयातील महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
डॉ. मनोज गुड यांनी विद्यार्थ्यांना अकॅडमिक विषयी संबंधी कोर्स, क्रेडिट, क्रेडिट लोड, सेमिस्टर, महाविद्यालयीन उपस्थिती, याविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. नंदकुमार भुते यांनी विद्यार्थ्यांना मुलांचे वसतिगृहाविषयी माहिती देताना स्वतःची स्वच्छता व वसतिगृहांमधील स्वच्छते विषयी माहिती दिली. वसतीगृहामधील नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्या विषयी समजावून सांगितले. डॉ. प्रेरणा भोसले यांनी परीक्षा पद्धती व विद्यार्थिनी वसतिगृहाची माहिती दिली. प्रा. कीर्ती भांगरे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची माहिती विद्यार्थ्यांना दिली.
महाविद्यालयाचे सहाय्यक कुलसचिव एकनाथ बांगर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक सेमिस्टर मध्ये वेळेत नोंदणी करणे व त्यासाठी दिलेल्या कॅलेंडर प्रमाणे फी भरणे गरजेचे असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार सौ वैशाली पोंदे यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सहाय्यक अधीक्षक अनिल शेळके, अमृत सोनवणे, सौ अंजली देशपांडे, सौ ज्योती सासवडे उपस्थित होते.
0 टिप्पण्या