पुस्तके हीच खरी आपली वंशरुपी अपत्ये असतात - डॉ. बाबुराव उपाध्ये

अहमदनगर/ जावेद शेख : साहित्यिक हा काळप्रवाहाचा ज्ञानसाधक असून त्याने लिहिलेली पुस्तके हीच खरी त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख देणारी, विचार,कार्य आणि जीवनमूल्यांची वंशरुपी अपत्ये असतात असे मत 21व्या पाथर्डी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. पाथर्डी येथे श्री चौंडेश्वरी सांस्कृतिक भवनमध्ये कृष्णा भोजनालय साहित्य मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पाथर्डी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते.

प्रारंभी प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उदघाट्न शिरूर येथील प्रसिद्ध साहित्यिक विठ्ठल जाधव यांच्या हस्ते संमेलन अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, स्वागताध्यक्ष राजेंद्र कोटकर, श्रीरामपूर येथील 'दैनिक स्नेहप्रकाश'चे संपादक, महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, साहित्य प्रबोधन मंचचे अध्यक्ष साहित्यिक डॉ. शिवाजी काळे, माजी संमेलन अध्यक्ष डॉ. कैलास दौंड, पाथर्डी प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, पुस्तक प्रदर्शन उद्घाटक शाहीर भारत गाडेकर आदींसह सर्व संयोजक उपस्थित होते.अध्यक्ष पदाची सूचना महेश वाघमोडे यांनी केली तर अनुमोदन अंबादास साठे यांनी दिले.

साहित्य मंडळाचे सचिव प्रा.संतराम साबळे यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्ष राजेंद्र कोटकर यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.यावेळी पार्थभूषण पुरस्कार वितरण करण्यात आले. श्री. तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड (शिक्षण ), अजिनाथ दहिफळे (सामाजिक ), मिनीनाथ टकले (शिक्षण ), घन:श्याम नाकील (कर्मचारी )यांना पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी संयोजकांचे कौतुक करीत सांगितले की, अशी ग्रामीण भागाला आणि दुर्लक्षित साहित्यिकांना लेखन प्रवासाला उत्तेजन देणारी साहित्य संमेलने गावोगावी झाली पाहिजेत.

शासन, समाज, साहित्य प्रेमींनी त्यासाठी योग्य सहकार्य केले पाहिजे, साहित्य संमेलन काही घेण्यासाठी नव्हे तर समाजाला भरभरून देण्यासाठी असतात. वाचन कमी होत असल्यामुळे हिंसा आणि दहशतवादी प्रवृत्ती वाढत आहे. पुरोगामी, प्रतिगामी, आस्तिक, नास्तिक अशी मानसिकता, वेगळेपणाची दरी निर्माण करण्यापेक्षा चांगला माणूस, सद्गुणी आणि दयाळू सेवाभाव जपणारा माणूस निर्माण करणे हे साहित्यिकांचे कार्य आहे. कोणतीही ताठरशाही माणसाला माणुसकीपासून लांब नेते या चक्रव्यहूत साहित्यिकांनी न सापडता जसे जगलो तसे प्रामाणिकपणे लिहावे असे सांगून 'शब्दसेतू' कविता सादर केली.

पुरस्कार्थीतर्फे प्राचार्य अशोक दौंड, प्रेस क्लबचे अध्यक्ष उमेश मोरगावकर, माजी संमेलनाध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड , उदघाटक विठ्ठल जाधव, पत्रकार प्रकाश कुलथे, साहित्यिक डॉ. शिवाजी काळे यांनी मनोगत व्यक्त करीत या साहित्य संमेलनाचे मुख्य प्रवर्तक अशोकराव व्यवहारे यांच्या योगदानाविषयी गौरवोद्गार काढले. २१ वर्षांपासून ही साहित्यवारी अखंड चालू ठेवल्याबद्दल पत्रकार प्रकाश कुलथे, डॉ. शिवाजी काळे यांनी संयोजकांचे कौतुक केले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या रूपाने श्रीरामपूरला संमेलन अध्यक्षपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानत शुभेच्छा दिल्या. डॉ. कैलास दौंड यांनी अगोदरची अनेक साहित्य संमेलने ही गर्दीने भरलेली असत परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या दर्दीमध्ये हे साहित्य संमेलन घेतले जात आहे, असे सांगून पाथर्डीकर आणि साहित्य मित्रमंडळ यांच्या योगदानातून हे २१वे साहित्य संमेलन संपन्न होत असल्याची माहिती दिली. उदघाटक विठ्ठल जाधव यांनी "अशी संमेलने ही साहित्य निर्मितीला प्रेरणादायी ठरतात असे सांगितले." 

याप्रसंगी प्रा.डॉ.अशोकराव कानडे, शशिकांत गायकवाड, अनुराधा प्रकाशनचे मान्यवर कवी, कवयित्री, विद्यार्थी उपस्थित होते. बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सौ. सुनील पालवे मॅडम यांनी 'बाबुजी ' हा गौरवग्रंथ देऊन संमेलन अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा आणि पाहुण्यांचा सत्कार केला. डॉ. उपाध्ये यांनी उपस्थित अनेकांना ग्रंथभेट देऊन सन्मान केले. विद्यार्थी काव्यवाचन, गायन, निबंधस्पर्धा, निमंत्रितांचे कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम, पुरस्कार वितरण, समारोप असे उपक्रम संपन्न झाले. सूत्रसंचालन प्रा.भाऊसाहेब गोरे, आरिफ बेग, महादेव कौसे यांनी केले तर हुमायून आतार यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या