राहुरी शहर/अशोक मंडलिक : शहरातील विविध विकास कामांकरिता सुमारे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अधिक माहिती देताना मंत्री तनपुरे यांनी सांगितले की नगरपालिकेच्या निवडणुकीत जाहीरनाम्यामधील असलेल्या जलतरण तलाव उभारणीस सुमारे दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. शहरातील पालिकेच्या मालकीच्या जागेत जलतरण तलाव सर्व सुविधायुक्त उभारला जाणार आहे. स्टेशन रस्त्यावरील पाण्याची टाकी ते श्रीहरी मंगल कार्यालय येथपर्यंत सुमारे चार कोटी रुपये खर्चाचे रस्त्याचे मजबुतीकरण व काँक्रिटीकरण कामास मान्यता मिळालेली आहे. तसेच स्टेशन रस्त्यावरील महात्मा फुले चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी 36 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला. या तीनही कामांना लवकरच प्रारंभ केला जाणार आहे. मी नगराध्यक्ष असताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली जात असून आणखीही निधी उपलब्ध होणार आहे. त्यातून बरीचशी कामे मार्गी लागतील केंद्रात व राज्यात आपल्या विचाराचे सरकार नसल्याने निधी मिळत नव्हता. मी आमदार व थेट राज्यमंत्री झाल्यानंतर निधीची कमतरता भासू दिली नाही. त्यामुळे विकासाचा गाडा वेगाने पुढे जात आहे. बस स्थानक इमारतीचा प्रश्न मार्गी लागला होता. 17 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात झाली होती. परंतु एसटीचा संप सुरू झाल्याने निधी कर्मचाऱ्यांच्या वेतनाकडे वर्ग झाला असे असले तरी पुन्हा नव्याने निधी प्राप्त करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत.
शहरातील नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक चे काम युद्धपातळीवर पूर्णत्वास जात असल्याने जाहीरनाम्यातील वचन पूर्ण केले आहे. राहुरी शहरातील विविध विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून कामे मार्गी लागत असल्याचे समाधान लाभत आहे. शहरातील महत्त्वकांक्षी योजनांना चालना देण्याचे काम सुरू असून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आपण विडा उचललेला आहे. शहरवासीयांचे मौलिक सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सूर्यकांत भुजाडी, भारत भुजाडी उपस्थित होते.
0 टिप्पण्या