ठळक बातम्या

स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी नंतरही दिन्नापुरकरांना डांबरी रस्त्यांची प्रतिक्षा

दिन्नापुर-कवडगाव ते ढोरकीन- दिन्नापुर रस्त्याची दयनीय अवस्था

◾पावसाळ्याचे चार महिने चिखल तुडवत शोधावी लागते वाट

◾प्रशासन, लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष

विलास लाटे/पैठण :  तालुक्यातील दिन्नापुर गावाला स्वातंत्र्याचे ७५ वर्षे उलटली तरी अद्याप पक्का डांबरी रस्ता या गावाला मिळाला नाही. पावसाळ्याचे चार महिने अक्षरशः चिखल तुडवत वाट शोधण्याची नामुष्की या गावातील नागरीकावर येते, यापेक्षा मोठे दुर्दैव दिन्नापुरकरांसाठी काय असेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तालुक्यातील दिन्नापुर हे गाव सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव आहे. पैठण-औरंगाबाद मुख्य रस्त्यावरील कवडगाव फाट्यावरून पश्चिमेस पाच किलोमीटर आत जावे लागते. विशेष म्हणजे याच रस्त्यावर साईबाबाची प्रकटभुमी धुपखेडा हे गाव पण लागते. तसेच धुपखेडा हे माजी आमदाराचे गाव असून याच गावापासून दिन्नापुर अवघ्या दोन-तीन किलोमीटर अंतरावर आहे. तरीदेखील स्वातंत्र्याला ७५ वर्षे उलटूनही दिन्नापूर गावाने कधीही पक्का डांबरी रस्ता व बस सेवा पाहिली नाही. दिन्नापुरला जोडणारे सर्वच रस्ते कच्चे आहेत आणि पावसाळ्यात चार महिने पूर्णपणे बंद असतात.

गरोदर स्त्रिया बाळंतपणासाठी जाताना रस्त्याच्या अडचणीमुळे खूप संकटात सापडतात. डेंग्यू, मलेरिया, कोरोना यासारख्या आदी आजाराने ग्रस्त रुग्ण, रस्त्याच्या अभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू पावलेले आहेत. दिन्नापुरला चारही बाजूने कच्चे रस्ते असल्यामुळे दिन्नापुर गावाचे एखाद्या समुद्रात सापडलेल्या बेटाप्रमाणे अवस्था झालेली आहे.

जालना औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार, त्याचप्रमाणे पैठण तालुक्याचे आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य या सर्वांनी दिन्नापुरकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिन्नापुरला आजही पक्क्या रस्त्याअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिन्नापुर गावासाठी ढाकेफळ आरोग्य केंद्राची सेवा उपलब्ध आहे. परंतु या आरोग्य केंद्रात जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना, त्याचप्रमाणे छोट्या-मोठ्या आजारावर उपचार घेणाऱ्या नागरिकांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दिन्नापुर गावाच्या जवळपास एक हजार मतदानाचा राजकारणी लोक केवळ मतदानापुरता वापर करून घेताना दिसत आहेत. 

विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसांत अक्षरशः खड्डयाच्या रस्त्यातून चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागते. हा रस्ता पाऊस पडल्यानंतर खराब होत असल्यामुळे परिसरातील शाळकरी मुले, मुली यांना शाळेत, नागरिक-कामगारांना कामानिमित्त बाहेरगावी जाणे अवघड होऊन बसले आहे. रस्त्यांची दुरवस्था झालेली असताना आश्वासन देणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांनासुद्धा लक्ष देण्यास वेळ नाही. याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दिन्नापुरला जोडणारे रस्ते पुढील प्रमाणे:

◾दिन्नापुर ते लोहगाव सहा किलोमीटर कच्चा रस्ता आहे. ◾दिन्नापुर ते ढोरकीन साडेचार किलोमीटर कच्चा रस्ता आहे. ◾दिन्नापुर ते कवडगाव पाच किलोमीटर रस्ता अनेक खड्डयांनी भरलेला आहे. ◾दिन्नापुर ते मुलांनी वाडगाव फाटा हा सात किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे कच्चा आहे.

————————————————–

रस्त्याच्या समस्येबाबत दिन्नापुरच्या तरुणांनी घेतली ऑनलाइन सभा…..

रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी गावातील तरुण एकवटले असून नुकतीच यासंदर्भात ऑनलाईन सभा घेऊन, या सभेमध्ये असे ठरले की, यापुढे दिन्नापुरला पक्का रस्ता मागणी समिती तयार करायची. ग्रामपंचायत स्तरापासून तर मुख्यमंत्री स्तरापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींना निवेदने द्यायची. लवकरच दिन्नापूर ग्रामस्थ पक्क्या रस्त्यासाठी मोठा लढा उभारणार आहेत. यामध्ये लोकशाही मार्गाने निवेदने देणे, पैठण-औरंगाबाद रस्त्यावर रास्ता-रोको करणे, लोकप्रतिनिधींच्या निषेधार्थ बॅनरबाजी करणे अशी आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. गटविकास अधिकारी यांच्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांना निवेदने देणे या प्रकारची रणनीती ठरविण्यात आली आहे. या ऑनलाईन सभेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये अक्षय खणसे, किरण खाटीक, मंगेश खाटीक, दीपक खाटीक, अरुण खाटीक, शिक्षक अशोक पाटील, कैलास महाराज खणसे, महेश खणसे अमोल खणसे, दिन्नापुरचे उपसरपंच संभाजी खणसे यांचा समावेश होता.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button