साहित्य व संस्कृती

श्रीरामपूरचे साहित्यिक वातावरण प्रेरणादायी आहे – महंत डॉ. राजधर सोनपेठकर

श्रीरामपूर/बाबासाहेब चेडेश्रीरामपूरच्या महानुभाव श्रीचक्रधर आश्रमात मी दीर्घकाळ वास्तव्य केले. श्रीरामपूरच्या बोरावके कॉलेजमध्ये मराठी विषयात एम. ए. करून डॉ.र.बा. मंचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. केली. श्रीरामपूरच्या शैक्षणिक वातावरणाबरोबर साहित्यिक वातावरण प्रेरणादायी असल्याचे मत अमरावती येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठातील महानुभाव अध्यासन विभागाचे प्रमुख महंत डॉ. राजधर सोनपेठकर यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे महंत डॉ.राजधर सोनपेठकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कविसंमेलन आणि साहित्यचर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी डॉ. बाबुराव उपाध्ये होते.वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष सौ. संगीता कटारे, फासाटे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. कविसंमेनात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी महानुभाव संप्रदायावरील डोमेग्राम, छिन्नस्थळी इत्यादी कविता सादर केल्या तर संगीता फासाटे यांनी वारकरी संप्रदायावरील श्रीविठ्ठल, संत ज्ञानेश्वर, संतमेळा विषयक कविता सादर केल्या. महंत डॉ. सोनपेठकर यांनी कविताविषयावर भाष्य करून सांगितले की, संप्रदाय कोणताही असो मानवी जीवनाचे कल्याण आणि माणुसकीचे भक्तिसूत्र हृदयात असले पाहिजे. भक्तीपेक्षा प्रेम उत्तमच असते. माणसाने माणसावर निरपेक्ष प्रेम केले पाहिजे. असे सांगून श्रीरामपुरात डॉ. बाबुराव उपाध्ये आणि साहित्यिक मित्रपरिवार वाचन संस्कृती वाढवत आहेत, आजच्या ऑनलाईन, तंत्रप्रधान जगात ही वाचन संस्कृती जपणे फार गरजेचे आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी त्यांची सर्व पुस्तके अमरावती विद्यापीठ महानुभाव अध्यासनाला दिल्याबद्दल कौतुक केले. अगोदरच डॉ.उपाध्ये यांनी या कार्याला अकरा हजाराची देणगी दिल्याबद्दल आमच्या कार्याला बळ मिळाले अशी आठवण सांगितली.

यावेळी सौ. मंदाकिनी उपाध्ये, सौ. कुंदा तुळे, नितीन जोर्वेकर, प्रा.सौ.पल्लवी सैंदोरे, कु.परी सैंदोरे, निर्मिक उपाध्ये, सौ. आरती उपाध्ये, प्रथमेश जोर्वेकर आदी उपस्थित होते. अध्यक्ष भाषणात डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी महंत डॉ.राजधर सोनपेठकर हे बोरावके महाविद्यालयातील आमचे एक गुणवत्ताधारक, अभ्यासू आणि नियमित विद्यार्थी होते. महानुभाव संप्रदायाचा त्यांनी केलेला अभ्यास आणि लिहिलेले साहित्य प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. सोनपेठकर म्हणजे प्रारंभीचे राजधर आराध्ये या परिसरात ज्ञानशील महंत असल्याबद्दल कौतुक वाटते.संगीता फासाटे यांनी सूत्रसंचालन केले तर नितीन जोर्वेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button