कृषी

शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

राहुरी विद्यापीठमहात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असलेल्या नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत आणि कृषि विभागाच्या सहकार्याने आयोजीत रब्बी ज्वारी व हरभरा उत्पादन तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम राहुरी तालुक्यातील कानडगाव या ठिकाणी आयोजीत केला गेला. यावेळी प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, ज्वारी सुधार प्रकल्पाचे संशोधन सहयोगी डॉ. सुरज गडाख, मंडल कृषि अधिकारी जयंत जाधव, कानडगावचे सरपंच मधुकर गागरे, प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख, डॉ. सचिन सदाफळ, कृषि सहाय्यक दुर्वेश पाटील, मेजर ताराचंद गागरे उपस्थित होते.


सुरुवातीला प्रकल्प समन्वयक डॉ. पंडित खर्डे यांनी सर्वांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविकात शेतकरी प्रथम प्रकल्पाची उद्दिष्ट्ये व उपलब्धी विषद केली. हरभरा उत्पादन तंत्रज्ञानाबाबत डॉ. नंदकुमार कुटे म्हणाले की शेतकर्यांनी पेरणी अगोदर बीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे. विद्यापीठाने विकसित केलेल्या फुले विक्रम, फुले विक्रांत आणि कोरडवाहूसाठी फुले विश्वराज या वाणांचा वापर करावा. डॉ. कुटे यांनी हरभरा पिकाची पेरणीची वेळ, योग्य वाणांची निवड, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन, साठवणूक याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. सुरज गडाख यांनी शेतकर्यांना रब्बी ज्वारीच्या अधिक उत्पादनासाठी पंचसूत्री तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. यामध्ये पेरणी अगोदर ओलावा व्यवस्थापन, जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचा वापर, पेरणीची वेळ, आंतरमशागत, पाणी व खत व्यवस्थापन आणि रोग व कीड नियंत्रणाबाबत डॉ. गडाख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री. जयंत जाधव यांनी कृषि विषयक योजनांची माहिती दिली. सरपंच मधुकर गागरे यावेळी म्हणाले की शेतकर्यांनी प्रगती साधायची असेल तर शास्त्रीयदृष्ट्या शेती करावी, पाण्याच्या उपलब्धतेनूसार पिकांचे नियोजन करावे. यावेळी चिंचविहिरेचे शेतकरी मारुती गिते आणि कणगरचे शेतकरी प्रविण गाढे यांनी शेतकरी प्रथम प्रकल्पाबद्दलचे आपले स्वानुभव सांगितले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात निविष्ठांचे वाटप करण्यात आले. सहसमन्वयक डॉ. भगवान देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे यांनी आभार मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाला कानडगाव, तांभेरे, चिंचविहिरे व कणगर गावातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमा अगोदर तज्ञांनी सोयाबीन आणि तूर प्रात्यक्षिक क्षेत्राला भेटी दिल्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी विजय शेडगे, किरण मगर आणि राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button