अहमदनगर

शिवसैनिकांच्या संतापापुढे कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची माघार

राहुरी – नगर जिल्हा शिवसेनेच्या वतीने दि. 20 मे रोजी एक पत्रक काढून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील यांनी कृषी विद्यापीठ राहुरी येथे गुरुवार दि. 25 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमांच्या पत्रिकेत शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांचे नाव न टाकल्यामुळे संताप व्यक्त केला होता. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त करत कृषी विद्यापीठातील कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता.

शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे कृषी विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. झालेल्या प्रकरणावर बाजू झटकण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून केला गेला. अखेर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांचे नाव प्रमुख उपस्थित मध्ये घेत शिवसैनिकांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे या कार्यक्रमाबाबत काय भूमिका घेतात हे अजून गुलदस्त्यात आहे. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील यांना शिवसैनिकांचा रोषाला समोरे जावे लागणार का ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

या सर्व घडामोडीत शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, उत्तर जिल्हाप्रमुख कमलाकर कोते, राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे, ह.भ.प.संपत काका जाधव, जयवंत पवार, अण्णासाहेब म्हसे, सुनील कराळे, अशोक तनपुरे, किशोर मोरे, प्रशांत खळेकर, महेंद्र उगले आदी जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक काय निर्णय घेतात व कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या कार्यक्रमावर याचा काय परिणाम होणार हे काळच ठरवणार आहे.

कृषी विद्यापीठ परिसरातील महादेव मंदिर काढण्याचे कुलगुरू प्रशांत पाटील यांनी तोंडी आदेश देवून मंदिराचे वरील पत्रे काढण्यात आल्यामुळे कुलगुरू पाटील यांच्या विरोधात सकल हिंदू समाज देखील आक्रमक झाल्याचे समजत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button