अहमदनगर

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांच्या उन्नतीसाठी करावा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा छत्तीसावा पदवीदान समारंभ संपन्न

डॉ. चारुदत्त मायी आणि पद्मश्री पोपटराव पवार यांना महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये “डॉक्टर ऑफ सायन्स” प्रदान

राहुरी विद्यापीठ : आपल्या देशात हरितक्रांती ही कृषि शास्त्रज्ञांमुळे आली व यानंतर आपला देश अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला. जगात ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी इतर देश आपल्याकडे अन्नधान्यासाठी बघतात. यामुळे कृषि क्षेत्र हे अति महत्वाचे क्षेत्र म्हणुन गणले जाते. या क्षेत्रात आपण पदवी घेतली आहे याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे आरोग्य खालावले असून ते सुधारण्यासाठी शेतकर्यांनी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करावा. भरडधान्य हे गरीबांचे धान्य म्हणुन गणले जायचे पण त्याच्यामधील पौष्टीकता लक्षात घेता या भरडधांन्याना आता जगात मान्यता मिळाली असून त्याचा आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे. शेतकर्यांना हवामानाचा अचूक अंदाज देण्यासाठी शास्त्रज्ञांनी व विद्यार्थ्यांनी यावर अधिक काम करावे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकर्यांच्या उन्नतीसाठी करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या छत्तीसावा पदवीदान समारंभात स्नातकांना उद्देशून अध्यक्षीय मार्गदर्शनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री ना. अब्दुल सत्तार, प्रमुख पाहुणे म्हणुन राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, नवी दिल्ली येथील कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, परभणी कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. चिमणराव पाटील, दत्तात्रय उगले, डॉ. प्रदिप इंगोले, गणेश शिंदे, संजीव भोर, अधिष्ठाता (कृषि) डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार आणि विद्या शाखेच्या उपकुलसचिव श्रीमती आशा पाडवी उपस्थित होते.
कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की तुमच्यावर भविष्यात शेतकर्यांना सक्षम करण्याची मोठी जबाबदारी असून शेतकर्यांबरोबरच शेतमजुर आणि गोरगरीबांसाठी काम करा. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल काकोडकर आपल्या दीक्षांत भाषणात म्हणाले की ग्रामीण भारताचा विकास कृषि शिक्षण घेतलेले विद्यार्थीच करु शकतात. तंत्रज्ञानाची अंमलबजावणी व त्याचा प्रसार व नविन तंत्रज्ञान मिळण्यासाठी आवश्यक असणारे वातावरण तयार केल्यास ग्रामीण भागाचे सशक्तीकरण होवू शकते. उच्च शिक्षण देणार्या संशोधन संस्था व त्यांचे पदवीधारक हे ग्रामीण भागात चांगले काम करुन गावाचे रुपांतर चांगल्या शहरात करु शकतात. त्यांच्या माध्यमातून स्थानिकांना जवळची असणारी उच्च तंत्रज्ञानयुक्त नाविन्यपूर्ण पर्यावरणाला अनुकुल पध्दत ग्रामीण भारताला नक्कीच उच्च पातळीवर पोहचवेल. कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील विद्यापीठ अहवाल सादर करताना म्हणाले की विद्यापीठ विविध विषयांमध्ये पदविका, कृषि पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदव्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. विद्यापीठाने कास्ट प्रकल्पाच्या माध्यमातुन ड्रोन तंत्रज्ञान याचबरोबर देशी गायीवरील संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. गेल्यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे सहा वाण, चार कृषि यंत्रे व औजारे आणि एकूण 70 तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकर्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत तसेच विस्तार शिक्षण क्षेत्रात विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
कृषि मंत्री ना. अब्दुल सत्तार आणि कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते कृषि शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी कृषि क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानीत केले. यावेळी कुलगुरु डॉ. पाटील यांनी मानपत्रांचे वाचन केले. तसेच यावेळी 62 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 382 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 6,388 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 6,832 पदव्या प्रदान करण्यात आल्या. पदवीदान समारंभात सन 2021-22 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. अपुर्वा वामन, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. सिध्दम्मा हलोली, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेली कु. शालीनी आभाळे यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
समारंभाला माजी कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे, डॉ. अशोक ढवण, माजी आ. चंद्रशेखर कदम, माजी अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, पुणे येथील कृषि परिषदेचे विस्तार संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के, कृषिभूषण सुरसिंग पवार, कृषिभूषण विष्णू जरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शिवाजीराव जगताप, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी केले. या कार्यक्रमानंतर पत्रकार दिनाच्या निमित्ताने उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button