औरंगाबाद

वाळूज महानगरमध्ये 300 खाटांचे जिल्हा उपरुग्णालय तातडीने उभारा – क्रांतीसेनेची मागणी

औरंगाबाद प्रतिनिधी : वाळूज महानगर मध्ये 300 खाटांचे जिल्हा उपरुग्णालय उभारण्यात यावे या मागणीचे निवेदन अखिल भारतीय क्रांतीसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील व भाई नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आले आहे.
    वाळूज महानगर हा परिसर संपूर्ण देशात यशस्वी औद्योगिक परिसर म्हणून ओळखला जातो. राज्यातील, देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून नागरिक या ठिकाणी रोजगारासाठी स्थायिक झाली आहेत. या औद्योगिक वसाहतीसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल भावाने शासनाला दिल्या आहेत. या भागातील जवळपास पन्नास गावे या औद्योगिक वसाहतीमुळे प्रभावित झालेले आहेत. या भागातील लोकसंख्या जवळपास पाच ते सात लाखांच्या पुढे आहे. परंतु शासनाच्या वतीने देण्यात येणार्‍या आरोग्य सुविधा अत्यंत तुटपुंज्या आहेत. एवढी मोठी वसाहत असूनही इथली आरोग्य व्यवस्था फक्त आरोग्य उपकेंद्राच्या भरवशावर आहे. हजारो कारखाने, लाखो कामगार, कष्टकरी असूनही या भागासाठी एकही सुसज्ज सरकारी दवाखाना या भागात असु नये. यापेक्षा दुर्दैव ते कोणते असू शकते! शासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या भागात खाजगी दवाखाने जनतेची सर्रास लुट करत आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये रोज अनेक कारखान्यात अपघात होत असतात. जखमी असलेले रुग्ण दाखल करताना या भागातील खाजगी रुग्णालयात मनमानी केली जाते, दाखल करून घेतले जात नाही, मग अशा वेळी औरंगाबाद शहरात जाण्याशिवाय पर्याय राहत नाही आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये उपचारासाठी आवश्यक असणारी महत्वाची वेळ वाया जाते आणि रुग्णाची अवस्था अजून बिकट होते. कामगार मंत्रालयाच्या वतीने नावालाच फक्त ई.एस.आय.सी. चा दवाखाना आहे, येथे गंभीर रुग्ण दाखल करून घेतले जात नाहीत.
   या भागातून वर्षाला जवळपास पाच हजार कोटींचा महसूल शासनाला दिला जातो. परंतु त्या बदल्यात जनतेला त्यांच्या हक्काच्या आरोग्यसुविधा ही दिल्या जात नसतील तर या गोष्टीला जबाबदार कोण ? म्हणूनच या निवेदनाच्या माध्यमातून वाळूज महानगरात तातडीने नागरिकांची गरज लक्षात घेऊन तिनशे खाटांचे जिल्हा उपरुग्णालय तातडीने उभारावे अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेना व जनतेच्या वतीने करण्यात आली. अन्यथा शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय क्रांतीसेनेचे अध्यक्ष संतोष तांबे पाटील, सरचिटणीस भाई नितीन देशमुख, संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे, तालुकाप्रमुख लक्ष्मण शेलार, वाळुज महानगराध्यक्ष दिनेश दुधाट, वाळूज महानगर उपाध्यक्ष दिपक गायकवाड, वाळूज महानगर युवाध्यक्ष औदुंबर देवडकर, जिल्हा संघटक राजू शेरे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button