अहमदनगर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ

खा. शरद पवार आणि ना. नितीन गडकरी यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवीने सन्मानीत करण्यात येणार
राहुरी विद्यापीठ/जावेद शेखमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवार दि. 28 ऑक्टोबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वा. आयोजीत करण्यात आला आहे. कृषि विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहामध्ये ऑफलाईन व ऑनलाईन पध्दतीने होणार्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी असणार आहेत. यावेळी कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती तथा कृषि मंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

याप्रसंगी उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषि व तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नरेंद्र सिंह राठौड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार असून ते दीक्षान्त भाषण करणार आहेत. यावेळी या समारंभासाठी विद्यापीठाचे विद्यापीठ कार्यकारी आणि विद्यापरिषदेचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी माजी केंद्रीय कृषि मंत्री खासदार शरद पवार आणि रस्ते, वाहतूक आणि परिवहन खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी देवून सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली.

पदवीदान समारंभात दोन वर्षातील विविध विद्याशाखांतील एकुण 11 हजार 468 स्नातकांना पदवी, पदव्युत्तर, आचार्य पदवीने कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्याद्वारे अनुग्रहित करण्यात येणार आहेत. त्यात विविध विद्याशाखातील 10 हजार 736 स्नातकांना पदवी, 628 स्नातकांना पदव्युत्तर पदवी तर 104 स्नातकांना आचार्य पदवीने अनुग्रहित केले जाईल. यावेळी यशस्वी स्नातकांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदके आणि रोख पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या समारंभात केवळ पारितोषिकेप्राप्त स्नातक व आचार्य पदवी स्नातक यांनाच प्रत्यक्ष मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. अन्य स्नातकांना संबंधित महाविद्यालयात ऑनलाईन पध्दतीने अनुग्रहित करण्यात येणार आहे. पदवीदान समारंभाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या यु-ट्युब चॅनेल तसेच झुम लिंकवरुन केले जाणार आहे.

Related Articles

Back to top button