अहमदनगर

मांजरसुंबा येथे कृषिकन्यांची मासिक आढावा बैठक संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगाव आयोजीत ग्रामीण कृषि जागरुकता आणि कृषि औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत राहुरी तालुक्यातील मांजरसुंबा येथे ग्रामपंचायतीने बांधलेल्या सभागृहात कृषि कन्यांची मासिक आढावा बैठक घेण्यात आली.
या मासिक आढावा बैठकीतून ग्रामीण कृषि जागरुकता कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. चारुदत्त चौधरी यांनी मांजरसुंबा, वांबोरी व कुक्कडवेढे या तीनही गावातील कृषिकन्यांकडून त्यांच्या मासिक कार्याचा आढावा घेतला. या मासिक बैठकीच्या अध्यक्षस्थानी गवत संशोधन योजनेचे संशोधन अधिकारी व केंद्र अधिकारी डॉ. विजयकुमार शिंदे होते. त्यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना कृषिकन्यांकडून शेतकर्यांना RAWE कार्यक्रमातून जास्तीत जास्त फायदा कसा होईल यावर भर देण्याचे आवाहन केले.
या मासिक आढावा बैठकीत मांजरसुंबा येथील कृषिकन्यांनी केलेल्या विविध प्रात्यक्षिक कार्यानुभव कार्यक्रमाबद्दल चर्चा केली. त्यामध्ये कृषिकन्यांनी मांजरसुंबा येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दळवी यांच्या मदतीने जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली. तसेच गावातील शेतकर्यांचे माती परिक्षणाचे प्रात्यक्षिक करून त्यांना माती परिक्षणाचे महत्त्व सांगितले, सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी दशपर्णी अर्क बनवून त्यांचे महत्त्व सांगितले. प्रमुख पिकामध्ये एकात्मिक पद्धतीने तण व्यवस्थापन प्रात्यक्षिकीकरण योग्य पद्धतीने कसे करावे व त्यावेळी कशा प्रकारे काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. सोयाबिन व कांदा या पिकांचे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून बीज प्रक्रियेचे महत्त्व पटवून दिले. तसेच साठविलेल्या धान्यामधील किडींची ओळख आणि नियंत्रण यावर प्रात्यक्षिक करून त्यांचे महत्व सांगितले व फळबागेमध्ये खतांची मात्रा टाकण्याबद्दलचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या मासिक बैठकीसाठी कार्यक्रम अधिकारी व वनस्पती शास्त्र विषयतज्ञ डॉ. सखेचंद अनारसे, वनस्पती रोगशास्त्र विषयतज्ञ डॉ. मनोज गुंड, कृषि विस्तार विषय तज्ञ डॉ. आनंद चवई, कृषि अर्थशास्त्र विषयतज्ञ डॉ. दत्तात्रय सानप, कृषि अभियांत्रिकी विषयतज्ञ डॉ. महेश पाचारणे, मृदाशास्त्र विषयतज्ञ डॉ. प्रेरणा भोसले, फलोत्पादनशास्त्र विषयतज्ञ प्रा. किर्ती भांगरे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. प्रगतशिल शेतकरी भागवत कदम व देविदास कदम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या शंकाचे निरसन केले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सायली गायकवाड, स्नेहल भगत, सोनाली बनकर, कल्याणी बचाटे व समीक्षा आव्हाळे यांनी परीश्रम घेतले. तीनही गावांमधील विद्यार्थिनींची मासिक आढावा बैठक यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचा समारोप प्रगतशील सेंद्रिय शेती करणारे शेतकरी चंद्रभान कदम यांनी आभार प्रदर्शनातून केला.

Related Articles

Back to top button