अहमदनगर

भारत देशाच्या उभारणीत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान- डॉ.मिलिंद अहिरे

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : भारत स्वतंत्र झाल्यानंतर देशापुढे अनेक समस्या होत्या, त्या सर्व समस्या सोडून देशाच्या उभारणीचे काम देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केले. त्यांच्या काळात त्यांनी अनेक प्रकल्प उभारले आणि देशाला चांगली दिशा दिली. देशाच्या उभारणीत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान खूप मोठे आहे असे गौरवोद्गार हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी काढले.
भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगाव येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूरचे प्रांत अनिल पवार उपस्थित होते. यावेळी कृषी महाविद्यालय, धुळेचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनील पाटील, नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रा. हेमराज राजपूत व सुरेश रहाणे हे उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शन करतांना प्रांताधिकारी अनिल पवार म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांविषयी खूप प्रेम होते व त्यामुळे आपण त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करत असतो. पालकांनी लहान मुलांची योग्य काळजी घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार करणे व भारतासाठी सुदृढ व संस्कारक्षम भावी पिढी निर्माण करणे ही आपली जबाबदारी आहे.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. प्रेरणा भोसले व प्रा. कीर्ती भांगरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सखेचंद अनारसे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सौ. अंजली देशपांडे यांनी मानले.

Related Articles

Back to top button