कृषी

पीक उत्पादनाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सौर उर्जा सिंचन प्रणाली प्रभावी – संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख

राहुरी विद्यापीठ : पीक उत्पादनाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सौर उर्जा सिंचन प्रणाली प्रभावी आणि सर्वात योग्य पर्याय आहे. या सौर उर्जा सिंचन प्रणालीचा अवलंब केल्यास शेतकर्यांची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारु शकते. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी व प्राध्यापक वर्गांना विविध सौर उर्जेचे प्रकल्प विद्यापीठात आणण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील जागतिक बँक अर्थसहाय्यित, हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाअंतर्गत प्राध्यापक, विद्यार्थी व शेतकर्यांसाठी सौर उर्जा सिंचन प्रणाली या विषयावर दुसर्या तुकडीचा तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम जबलपूर- मध्यप्रदेश येथे बोरलॉग इनस्टिट्यूट ऑफ साउथ एशिया (बीसा) येथे दि. 2 ते 5 ऑगस्ट दरम्यान संपन्न होणार आहे. या तुकडीला निरोप देतांना डॉ. शरद गडाख बोलत होते.
या तीन दिवसांच्या प्रशिक्षणात बोरलॉग इन्टिट्युटचे प्रमुख पंकज सिंह व त्यांचे नवी दिल्ली येथिल सहकारी परेश शिरसाठ आणि श्री. क्षितिज पांडे हे प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरु. डॉ पी. जी. पाटील यांच्या सुचनेनुसार व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक आणि कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील प्राध्यापक विद्यार्थी व शेतकरी यांच्यासाठी सदरील प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रसंगी कास्ट प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रशिक्षणाची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ. मुकुंद शिंदे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन डॉ. सचिन नांदगुडे यांनी केले. सदरील तुकडीचे नेतृत्व डॉ सचिन सदाफळ व डॉ. शुभांगी घाडगे करत आहेत.

Related Articles

Back to top button