कृषी

तुरीवरील वांझ रोगाचे नियंत्रण सहज शक्य – प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठ : वांझ रोगास प्रतिकारकक्षम वाणांची लागवड करुन लागवडीनंतर जर 20 व 40 दिवसांनी शिफारास केलेलया कोळीनाशकांची फवारणी केली, तसेच वांझ रोगाचा प्रादुर्भाव झालेले वांझ रोगग्रस्त झाड दिसताच मुळासह उपटून त्वरीत नष्ट केले तर आपण तुरीवरील वांझ रोगाचे नियंत्रण सहज करु शकतो असे प्रतिपादन कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.
कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ व त्यांच्या चमुने शेतीदिन, शास्त्रज्ञ भेट आणि माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी या उपक्रमांतर्गत संपुर्ण एक दिवस शेतकर्यांसोबत व्यतीत करण्यासाठी मांदळी, ता. कर्जत येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयेजन करण्यात आलेले होते त्यावेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. नंदकुमार कुटे बोलत होते. याप्रसंगी किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ, रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण, मांदळी गावच्या सरपंच सौ. शामली वाघ, मंडळ कृषि अधिकारी आर.एस. राउत व फार्मर प्रोड्युसर कंपनीचे शरद मेहेत्रे उपस्थित होते.
यावेळी डॉ. कुटे पुढे म्हणाले की वांझ रोगाचा प्रादुर्भाव हा पीजन पी स्टरीलिटी मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे होत असला तरी त्याचा प्रसार मात्र एरिओफाईड माईट या कोळीमुळे होत असतो. त्यामुळे एरिओफाईड माईटच्या नियंत्रणासाठी जर गोदावरी, भिमा, बी.डी.एन.716 या सारख्या वांझ रोगास प्रतिकारकक्षम वाणांची लागवड केली, शेतात व बांधावर असलेली मागील हंगामातील तुरीची झाडे काढून टाकली, तुरीचा खोडवा घेतला नाही आणि तूरीच्या लागवडीनंतर जर 20 व 40 दिवसांनी डायकोफॅाल 18.5 ईसी 2.0 मिली/लिटर किंवा फेनाझाक्विन 10 ईसी 1.0 मिली किंवा पाण्यात मिसळणारे गंधक 80 डब्लयू पी 2.5 ग्रॅम/ लिटर पाण्यातून फवारणी केली तर आपण तुरीवरील वांझ रोगाचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करु शकतो.
डॉ. चांगदेव वायळ यांनी सांगितले की, सध्या तुरीवर पानाफुलांची जाळी करणारी अळी (मरुका अळी), शेंगा पोखरणारी अळी (घाटे अळी) व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. जर आपण वेळीच या किडींचे नियंत्रण करु शकलो नाही तर मात्र किडींच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या उत्पन्नात 30 टक्यांपेक्षा जास्त घट येवू शकते. त्यामुळे किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी आपण 5 कामगंध सापळे व 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावावेत, पिकाच्या कळी अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा 1500 पीपीएम ॲझाडिरेक्टीन 5 मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी, पिक 50 टक्के फुलो-याच्या अवस्थेत असतांना हेलिओकिल (एचएएनपीव्ही) 250 एलई 2 मिली/लिटर पाणी किंवा बॅसिलस थ्युरिनजेनेसीस 2 ग्रॅम/लिटर पाणी आणि यानंतर 15 दिवसांनी इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही 0.7 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के दाणेदार 0.4 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 0.3 मिली/लिटर पाणी या प्रमाणे जर सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी केली तर आपण किडींचे प्रभावीपणे नियंत्रण करुन तुरीचे चांगले उत्पन्न घेवू शकतो.
यावेळी डॉ. विश्वास चव्हाण यांनी सांगितले की, तुरीवर 10 पेक्षा जास्त रोगांचा प्रादुर्भाव होतो. परंतु यापैकी वांझ रोग व मर रोग या दोन रोगांमुळेच तुरीचे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिकारक वाणांची लागवड करणे, बिजप्रक्रिया करणे, पिकांची फेरपालट करणे तसेच तुरीचा खोडवा ठेवू नये. यावेळी मांदळी गावचे कृषी सहाय्यक सौ. आशा मेहेत्रे व एस. पी. खेतमाळीस व शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button