कृषी

ड्रोन तंत्रज्ञान ठरणार शेती क्षेत्रासाठी वरदान- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

राहुरी विद्यापीठ : हवामान बदलाचा परिणाम दिवसेंदिवस वाढत असून त्याचा सर्वात जास्त परिणाम शेती क्षेत्रावर होत आहे. कृषि क्षेत्रात ड्रोनमुळे खते, बियाणे, किटकनाशके आणि तणनाशके या सारख्या सर्व संसाधनांचा कमी वापर करण्यासाठी, शेतीमधील कामाचे श्रम कमी करण्यासाठी उपयोग होतो. अशा परिस्थितीत ड्रोन तंत्रज्ञान शेती क्षेत्रासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे रिमोट पायलट (ड्रोन) प्रशिक्षणाच्या प्रथम तुकडीच्या समारोप प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील ऑनलाईन उपस्थित होते. कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी विमान उड्डान महासंचालनालय, भारत अधिकृत रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत पहिल्या प्रशिक्षणाचे आयोजन दि. 6 ते 12 डिसेंबर, 2022 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे करण्यात आले होते. याप्रसंगी संशोधन संचालक तथा कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ती विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे व जलसिंचन व निचरा विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनिल कदम उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी प्रशिक्षणार्थींशी ड्रोन तंत्रज्ञानाविषयी सविस्तर चर्चा केली. डॉ. सचिन नलावडे यांनी या सात दिवसीय रिमोट पायलट प्रशिक्षणाचा आढावा सादर केला. इंजि. योगेश जाधव, सुजीत वरटे, नंदकुमार कडु व भाऊराव बडाख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रशिक्षणासाठी डॉ. सचिन नलावडे व मुंबई येथील ग्राउंडझिरो एरोस्पेसचे राहुल आंबेगावकर व ध्रिती शहा हे तज्ञ लाभले होते. यावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना डॉ. सुनिल गोरंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सुनिल कदम यांनी केले. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधुन आलेल्या प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदविला.

Related Articles

Back to top button