ठळक बातम्या

जेष्ठ नागरिक, पत्रकार यांची रेल्वे सवलत नाकारणे अन्यायकारक – पोखरकर

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : भारतीय केंद्रीय रेल्वे विभागाकडून आजपर्यंत जेष्ठ नागरिक आदींना रेल्वे प्रवास भाड्यामध्ये वर्षानुवर्षे सवलत मिळत होती. आता या सरकारला रेल्वे प्रवास भाडे सवलत रद्द करून काय साधणार आहे. उलट सवलत रद्द करण्यामुळे जेष्ठ नागरिक यांची प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होणार आहे. फक्त तातडीच्या कामासाठी जाणारेच वृद्ध पूर्ण भाडे देऊन प्रवास करतील ही दुसरी बाजू रेल्वे विभागाच्या लक्षात येत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे वृद्धांसाठी विविध योजना आखत आहेत. इपीएस ९५ पेन्शनवाढ प्रश्नी दिलासा देत आहेत. भारतातील अनेक राज्य सरकारे जेष्ठ नागरिकांना पत्रकारांना विद्यार्थ्यांना महिला एस टी बसमध्ये प्रवास भाड्यात सवलती देत आहेत. आता तर हे सरकार विविध सवलती रद्द करून आम जनतेचा रोष ओढवून घेताना दिसत आहे. त्याचा प्रत्यय आता हिमाचल प्रदेश झालेल्या निवडणुकीवरून दिसत आहे. तेथे फक्त राज्यातील इपीएस पेन्शनर्स यांनी पेन्शनवाढीचा प्रलंबित मुद्दा यावर सरकारने निर्णय दिला नाही याच मुद्द्यावर विरोधी मतदान झाले हे प्रसार माध्यमांनी जाहीर केले.
आज सरकारने कोरोना काळातील केंद्रीय कर्मचारी यांना १८ महिन्याचा डी ए व डीआर मिळणार नाही असे जाहीर केले.रेल्वे विभागाने जेष्ठ नागरिकांना पूर्ववत प्रवास भाडे सवलत द्यावी यासाठी देशातील अनेक संघटना यांनी निवेदने दिली तरी सरकार सवलत रद्द करण्याच्या निर्णयावर ठाम आहे हे योग्य नाही. अशा विविध प्रकारे येणाऱ्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो याचा विचार करून त्यासाठी महाराष्ट्रातील व देशातील जनतेने निवडून दिलेल्या खासदारांनी केंद्र सरकारकडे वारंवार आवाज उठवून रेल्वे प्रवास भाडे सवलत पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी खा.सुजय विखे व खा.सदाशिव लोखंडे यांना जेष्ठ नागरिकांच्या सह्याचे व पेन्शनर्स सह्याचे निवेदन त्वरित सादर करणार असल्याची माहिती राष्ट्रीय संघर्ष समितीचे प.भारत संघटक सचिव सुभाष पोखरकर यांनी दिली.

Related Articles

Back to top button