राजकीय

चिंचोलीच्या उपसरपंचपदी अखेर विलास लाटे यांची वर्णी

राहुरी/प्रतिनिधी : ज्येष्ठ मंडळींच्या समजावणीच्या सुराला छेद देत नि बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना सपशेल धुडकावत अखेर तालुक्यातील पॉवरफुल समजल्या जाणाऱ्या चिंचोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी युवक कार्यकर्ते विलास सिताराम लाटे यांची वर्णी लागली आहे.


बारा पोरांची चिंचोली अशी पुर्वापार ओळख असलेल्या व बारा सदस्य जागा असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक विखे पाटील यांच्या दोन गटात होवून एका गटाला लोकनियुक्त सरपंचासह सात जागा मिळवत पुर्ण बहुमत मिळाले आहे. सुरुवातीपासूनच उपसरपंच फिरते ठेवण्याचा निर्णय झाला असल्याने सात महिन्यात उपसरपंच बदल होत असतो. अवघ्या वर्षभरात मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतीत दोन जणांना उपसरपंच पदाची संधी देणे बाकी होते. त्यानुषंगाने मंगळवारी लोकनियुक्त सरपंच गणेश हारदे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी सदस्य मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. यात सत्ताधारी गटाच्या एका सदस्याचे दु:खद निधन झाले आहे. मात्र सत्ताधारी गटाकडे बहुमत होते.

ही निवड बिनविरोध व्हावी म्हणून ज्येष्ठ मंडळींनी अथक प्रयत्न केले. मात्र युवकांच्या महत्वकांक्षेपुढे हे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. अखेर दोन्ही उमेदवारांनी आपापले उमेदवार अर्ज दाखल केले व शेवटी गुप्त मतदान होवून विलास लाटे यांना सात मते मिळाली पर्यायाने उपसरपंच पदावर त्यांची वर्णी लागली. विरोधी गटाचे एक मत फुटून सत्ताधारी गटाला यावेळी मिळाले.
निवडणूक अधिकारी म्हणून श्री थोरात यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामसेवक ताराचंद गाडे यांनी सहाय्य केले. प्रसंगी नवनिर्वचित उपसरपंच विलास लाटे यांचा सत्कार करण्यात आला.

प्रसंगी सरपंच गणेश हारदे यांनी ही निवड बिनविरोध होण्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी प्रयत्न केले परंतू त्यांना युवकांच्या महत्वकांक्षेपोटी अपयश आले याबद्दल ज्येष्ठ मंडळींप्रती दिलगीरी व्यक्त करत आगामी काळात निश्चित सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. प्रसंगी जालिंदर काळे, विखे पा. कारखान्याचे संचालक अशोक गागरे, पत्रकार बाळकृष्ण भोसले, सर्जेराव लाटे यांनी यथोचित मनोगतात नवनिर्वचित उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी मंगल कातोरे, विद्या माळी, सुलोचना कातोरे, सुनिता भोसले, सौ. गागरे, अमोल भोसले, बाळासाहेब काळे, शरद आरगडे, संजय राका, दिलिप दाढकर, रायभान नलगे, विजय सिनारे, स्वप्नील कातोरे, बाळासाहेब लाटे, गणेश लाटे, सुनील लाटे, दत्तात्रय हारदे, आदिंसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. विलास लाटे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
युवकांच्या महत्वकांक्षा मोठ्या असतात. महत्वकांक्षा ठेवणं गैर नाही, मात्र प्रथम आपले गावं हा मुलमंत्र जपत गावविकासासाठी कधीकधी त्यागाचीही तयारी दाखवली तरच गावचा व पर्यायाने कुटूंबाचा विकास होत असतो. आगामी काळात या गोष्टिंवर भर द्यावा लागेल.  संघटनात्मक विकासावर तरुणांनी भर देण्याची गरज आहे. यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे.
     – जालिंदर काळे (ज्येष्ठ नेते)

Related Articles

Back to top button