अहमदनगर

खड्डे बुजविण्यासाठी आलेले १० कोटी गेले कुठे ? नाहीतर आम्ही खड्ड्यात गाडुन घेतो – नगर मनमाड रस्ता दुरूस्ती कृती समिती

राहुरी प्रतिनिधी : नगर-मनमाड रस्त्यावर पडलेले खड्डे डांबरीकरण करून बुजवा अन्यथा आम्ही रस्त्यातील खड्यात गाडून घेतो अशा आशयाचे निवेदन राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना नगर-मनमाड रस्ता दुरूस्ती कृती समितीच्या वतीने देण्यात आले.

या प्रसंगी वसंत कदम, देवेंद्र लांबे, श्रीकांत शर्मा, सतिष घुले उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून नगर मनमाड रोडवर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या माध्यमातून प्रशासनाने रोडवर पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न हा डांबरीकरण करून व्यवस्थित बुजविण्यासाठी विविध आंदोलने केली आहे, जेणेकरून प्रशासनाला व नगर जिल्ह्यातील आमच्या पुढार्यांना जनतेला होणारा हा मानसिक, शारीरिक त्रास लक्षात यावा, रोडचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा यासाठी कृती समिती प्रयत्नशील आहे.
दरवेळी आंदोलनानंतरच रोडवर पडलेली खड्डे डांबरीकरण करून बुजविली गेली आहेत :
मागील वर्षी सन२०२० रोजी सुद्धा याचप्रकारे आंदोलन झाल्यानंतर रोडवरील खड्डे बुजविण्यासाठी १० कोटींच्या निधीची कामे झाल्याचे बोलण्यात येत होते पण केवळ एका पावसातच हे १० कोटी कसे काय वाहून गेले याचा प्रश्न आता नागरिकांना पडायला लागला आहे. या १० कोटी निधीमध्ये अजून कोण कोण हिस्सेदार होते? या सर्व प्रश्नांची उत्तरे आमच्यासह नागरिकांना पडली आहेत. दर वर्षी पावसाळा आला की रोडवर पुन्हा जीवघेणे खड्डे तयार होतात व त्यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी हा घेतला जातो. मागील वर्षी नगर मनमाड रोडच्या निर्मितीसाठी ५०० कोटींचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. अशी माहिती प्रसार माध्यमांद्वारे समजल्या नंतर कृती समितीने सुटकेचा निस्वास टाकला होता. मार्च २०२१ पर्यंत या रोडचे काम सुरू होणार अशी माहिती पसरविण्यात आलेली होती. पण नेहमीप्रमाणे जनतेला वाऱ्यावर सोडून प्रशासनाने आज ऑगस्ट २०२१ अखेर रोडच्या कामाला सुरुवात ही केलेली नाही. सद्यस्थितीत नगर मनमाड रोडवर दररोज खड्ड्यांमुळे अपघात होत असून रोज कुणी ना कुणी या खड्ड्यात पडून जीव गमावत आहे, गंभीर स्वरूपाची दुखापत ही होत आहे. नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या माध्यमातून आमची प्राथमिक मागणी ही आहे की, रोडचे काम सुरू होईल तोपर्यंत ही रोडवर पडलेली जीवघेणी खड्डे ही तात्काळ डांबरीकरण करून बुजविण्यात यावी जेणेकरून नाहक कुठल्या नागरिकांचा बळी या खड्ड्यांमुळे जाणार नाही.

पुढील १० दिवसांत जर नगर मनमाड रोडवर पडलेली ही खड्डे व्यवस्थित डांबरीकरण करून बुजवली नाही गेल्यास; या रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे जर यापुढे अपघातात कुणाचा बळी गेला तर संबंधित ठेकेदाराविरुद्ध कृती समिती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणार आहे. तसेच दि ११ सप्टेंबर रोजी रोडवर पडलेल्या खड्ड्यात पडून विनाकारण जीव जाण्यापेक्षा कृती समितीचे कार्यकर्ते राहुरी फॅक्टरी या ठिकाणी रोडच्या कडेला खड्डे खोदून स्वतःला या खड्ड्यात अर्धे बुजवून घेतील व जोपर्यंत रोडवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करत नाही तोपर्यंत या खड्ड्यात यास्थितीत राहतील,असा इशारा या निवेदनाद्वारे नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे. या आंदोलनात आमच्या जीविताला काही धोका झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासन, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार यांची राहील याची नोंद घ्यावी, असे म्हटले आहे.

निवेदनावर अमोल वाळूंज, प्रमोद विधाटे, नसीब पठाण, रोहित नालकर, सचिन तारडे, तुषार कदम, प्रसाद कदम, सचिन कदम, नितिन मोरे, विठू राऊत, दुर्वेश वाणी, अमोल कदम, सुहास भांड, बाबासाहेब खांदे, सुजय पुजारी, संतोष कदम, शिवाजी पटारे आदींनी सह्या केलेल्या आहेत.

Related Articles

Back to top button