कॉलेज कट्टा

कॉलेज कट्टा- भाग ५२

आनंदी कट्ट्यानंतर मुद्दामून एका वेगळ्या कट्ट्यावर आज आपण बोलणार आहोत. प्रत्येक महाविद्यालयात एक अशी गॅंग असते, जी टपोरी, उनाड, व्रात्य, कुकर्मी म्हणून अस्तित्वात असतात. कट्ट्याची नावे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असतात. धुरळा बॉईज, सायलेन्सर, भावा, डाव धिंगाणा, पुंगळी गॅंग असेही नाव मी एका ठिकाणी ऐकले आहे. एकंदरीत आपणास सगळ्यांच्या ध्यानात आलेच असेल, की मी कुठल्या टपोरी कट्ट्या विषयी बोलतो आहे. त्यापेक्षा जास्त उचित होईल या कट्ट्यावरची बहुतेक मंडळी ही बर्‍यापैकी पुरुष जातीची असतात. थोडीशीच असतात पण खूप वात्रट असतात. अर्थातच आजचा कट्टा म्हणजे टपोरी कट्टा! बोले तो जरा हटेला कट्टा. दिमागकी बत्ती बुजाने वाला कट्टा…

आपल्या प्रत्येकात थोडाफार तरी खोडकरपणा, व्रात्यपणा, चुगलखोरपणा लपलेला असतोच…
मग हीच गॅंग अत्यंत खोडकर अशी का? याला अनेक कारणे आहेत. ती सामाजिक आहेत, ती ज्या वातावरणात वाढली त्यातली आहेत.! काही राजकीय, आर्थिक, तर काही पालक दोषांची आहेत. कधी कधी काही घटकांची ती लाडकी असल्याने हा धोका असू शकतो…
प्रत्येक महाविद्यालयात अशा प्रकारची गँग असतेच असे नाही.
           ही काय काय उद्योग करतात? या कट्ट्यावर ची मुलं ओळखणं फार सोपं असतं. बऱ्याचदा दोन-चार अती लाडात वाढलेली, अती श्रीमंतीचा माज असलेली काही मुलं, कधीकधी एका किंवा दोन्ही कानात बाळ्या, किंवा छोटीशी मुरणी पण कानात, बुलेट किंवा तत्सम केटीएम सारख्या वाहनाची सायलेन्सर ची पुंगळी काढलेली, जेणेकरून धडामधूम धड धड आवाज करत गाडी चालवत असतात. नॉर्मली एका गाडीवर एक दोघे ती कधीच बसत नाही. एकटा तर शक्यतो नसतोच, तीन तर कधी चार जण बसून उंडारतात, हाताच्या बाह्या मुडपलेल्या, कडक, भडक कपडे, हातात एखादं कडं, ब्रेसलेट, धागा यातले काही बर्‍यापैकी धार्मिक पण दिसतात. केसांच्या बटाना रंग थापून नानाविध रचना वगैरे वगैरे वगैरे. छातीचा पिंजरा पण तरीसुद्धा त्या फासळ्या दाखवण्यासाठी शर्टाचे एक किंवा दोन बटणे उघडी असतात. ही मनुष्य जमात वर्गात सहसा सापडत नाही किंवा सापडली तर ती काहीतरी कारनास्तव तिथे आलेली असतात.
विजातीय प्राण्याला त्रास देण्यासाठी यांचा जन्म असतो की काय ? अशी शंका येऊ शकते.       
        महाविद्यालयातल्या यांच्या काही जागा ठरलेल्या असतात. गाडीवर तलवारी घेऊन केक कापणे सारखे काही फुटकळ कार्यक्रम असतात. महाविद्यालयाच्या बाहेर दमदाटी करणे, वगैरे वगैरे… त्यांच्या भूमिकेत आपण नको जायला कारण जे जे म्हणून वाईट वंगाळ आहे ते कृत्य ही मंडळी करन्याची ताकत ठेवतात. हातात एखादं कडं, ब्रेसलेट इ. हे झालं यांचं बाह्य वर्णन.
      खरंतर अंतरिक ही चांगली असतात. यांचा उत्तम उपयोग करून घेतला तर!!!, ही पुढे अत्यंत चांगल्या दर्जाची पुढारीपण करणारे होतात. पुढारीपण म्हणजे राजकीय नव्हे, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काही ना काही नाव कमावणे पर्यंत यांची उत्तम मजल जाऊ शकते. फक्त इन्स्टिंक्ट, स्टिम्युलस किंवा जो चेंज ओव्हर लागतो तो यांना मिळायला हवा. सोप्या भाषेत बूस्टर डोस म्हणूयात. यांना सरळ मार्गावर आणता येऊ शकते. फक्त जरा त्यांच्या हृदयात हात घालावा लागतो. त्यांच्या कले केलेने घेऊन त्यांच्याकडून काहीशी चांगली काम करून घेता येऊ शकतात. यांच्यातला एखादा म्होरक्या सगळ्या ग्रुपचं बरं-वाईट ठरवत असतो.
हल्ली मला सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील दौलतराव ची भूमिका करणाऱ्या गटाचे याच्याशी खूप साधर्म्य वाटतं. यांना मानसिक आधाराची खरंच गरज असते हे मात्र नक्की. यांच्या संधीला वाट मिळाली तर ही मंडळी आयुष्यात खूप काही करताना दिसतात. उत्तम लीडरशिप, चांगले खेळाडू, चांगले राजकारणी, होतात. फक्त तो बदलण्याचा क्षण यावा लागतो. तो एकदा टळला तर, उलट घडते. त्यातल्या काही जणांची आयुष्य वाहवत गेलेली सुद्धा बघायला मिळाली आहेत, बरेच शिक्षक यांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी अतोनात प्रयत्न करत असतात. अगदी येनकेन प्रकारेण साम, दाम, दंड, भेद वापरून…
मी तर नेहमी या मताचा असतो की घोड्याला पाणी पाजण्यासाठी पाण्यापर्यंत न्यावे, नाही पीत का? ओके! नो प्रॉब्लेम? त्याला चार दिवस पाण्याविना उपाशी ठेवा! तहानलेला झाला की मग तर पाणी पिईल. अर्थात घोड्याने ठरवलेच असेल की पाणी नाहीच प्यायचं तर तो आणि त्याचं फुतुरे (future)…😞
        इंदापूर शहरात सुरुवातीच्या काळात मी गेलो. वर्षानुवर्ष पुण्यात राहून आलो होतो, आणि एक गँगमन असाच म्हणाला काय राव द्या की ऍडमिशन! त्याची आवाजाची पातळी, त्याचा अविर्भाव त्याच्या बोलण्याची पद्धत, ते चावी बोटात घालून गरागरा फिरवणे, आणि त्याच्या मागे असलेली त्याची हांजी हांजी करणारी पोरं, हे तुम्ही इमॅजिन करू शकता…
      त्यावेळी मला खूप राग आला होता. पण माझ्या स्वभावानुसार शांतपणे गिळला. त्याला प्रवेश दिला नाही हा भाग सांगणे न लगे! त्याला सगळं समजावून सांगितलं तो समजण्या पलीकडचा असणारच, हेही समजून घ्या… पण आता मीच बदललो आता मीच काय राव घ्या की ऍडमिशन…🤣
      अर्थात हे प्रश्न हे प्रसंगानुरूप असतात. त्या त्या प्रसंगाच्या वेळी जे जे सुचेल त्या त्या प्रमाणे आम्ही प्राध्यापक किंवा प्राचार्य मंडळी हा प्रश्न सोडवत असतो. यासाठी काही मुलांची मदत घ्यावी लागते. अगदी टोकाचं म्हणून पोलिसही बोलवावे लागतात पण ते क्वचित… ( त्यांना शक्यतो बोलवू नये असं मला नेहमीच वाटत आले आहे. ) मित्रहो या विषयावर फार लिहिलं जात नाही. फार बोलले जात नाही. 
      मुळात मला शंका येते, निर्भया पथकाची किंवा पास्को कायद्याची, किंवा मुळातच अशा कायद्यांची एवढी गरज आपल्याला का असते? किती जणांसाठी असतात?; हे कायदे, हाताच्या बोटांवर मोजण्यासाठी पण केव्हढी यंत्रणा कामाला लागते. 
प्रत्येक महाविद्यालयात शिस्त समिती करावी लागते. सीसीटीव्हीचा तो जांगडगुत्ता लावावा लागतो. शिपाई मामांना बऱ्याच ठिकाणी उभं करावं लागतं. खूप साऱ्या पाट्या लावाव्या लागतात. पोलीस यंत्रणा कधी कधी कामाला लावावी लागते. शहरातल्या प्रतिष्ठित नागरिकांना यामध्ये काही सूचना द्याव्या लागतात. अनेकदा या विषयावर आधारित कार्यक्रम करावे लागतात. व्याख्याने घ्यावी लागतात. नाटकं बसवावी लागतात. मुलींसाठी निर्भया पथक किंवा स्वसंरक्षणाचे धडे द्यावे लागतात. एवढं सगळं करुन व्हायचं तेच होतं. 
         आपण वाचलेच असेल की परवा एका नववीतल्या मुलींने छेडछाड होते म्हणून आत्महत्या केली, केवढी दुर्दैवी घटना आहे… बऱ्याच वेळा अशा मुलांच्या या कृत्यांवर अकारण दबाव किंवा इतर गोष्टींमुळे पांघरून घालावं लागतं, पण या पांघरून घातल्याने नव्याने प्रश्न निर्माण होतात ते पुन्हा डोकं वर काढले जात. त्रास सगळ्याच सिस्टीमला व्हायचा तोच होतो.
शैक्षणिक संकुलात आपण काऊन्सेलिंग म्हणतो, त्याला समजावून सांग म्हणतो, शिकवण संस्कार म्हणजे काय? चार-पाच तास महाविद्यालयात आणि उरलेला संपूर्ण वेळ घरी किंवा समाजात वावरतात. दोष कुणाला द्यायचा? वास्तविक कठोर शिक्षा हा जरी उत्तम मार्ग वाटत असला, तरी सुद्धा भल्याभल्यांचे परिवर्तन बोलण्यातून होतं किंवा त्याच्या ईगोला व्यवस्थित हाताळले तर प्रश्नाचे निराकरण करणं शक्य होतं.
सुक्ष्मजीवशास्त्राचा एक ढोबळ नियम आहे पाच टक्के जिवाणू चांगले असतात, तर पाच टक्के वाईट, उर्वरित ९० टक्के न्युट्रल अर्थात चांगले किंवा वाईट नसतात. गंमत अशी असते की ज्यांचे प्रमाण ५ टक्यावरून ६ टक्क्यावर जाते, ते ठरवतात की पदार्थाचे काय करायच? वानगी दाखल दुधाला दह्याच विरजण (चांगले जिवाणू) घातलं की सगळ्या दुधाच पुढच्या १२ तासात दही होतं, पण याच दह्यात वाईट जिवाणू सोडले व त्याची टक्केवारी ६ च्या पुढे गेली की दह्याच वाटोळं होत.
मोरीतून किंवा बेसीनच्या भांड्यातून जाणाऱ्या पाण्याला घाण वास नसतो पण तेच आपण गटारात पाहतो की हे पाणी सडलेले, अत्यंत गलीच्छ व घाणेरड्या वासाचे असते. जसे उकीरड्यावरही होते किंवा कचरा कुंडीत. पण हल्ली s1,s9 किंवा तत्सम चांगल्या जिवाणूंचा मारा करतात म्हणजेच चांगल्या सहा टक्के जिवाणूंचा मारा केला की वास (मिथेन व इतर 💨) काही तासांनी बंद होतो.
थोडक्यात काय चांगल्या / वाईटाच ठरणं त्या जादा १ टक्क्यावर अवलंबून राहतं.
        समाजातही असेच असेल का ? समाजात ५ टक्के लोक सच्चे असतील, तर ५ टक्के लुच्चे असावेत, उरलेल्या ९० टक्यांना कच्चे म्हणूयात. सच्च्यांच प्रमाण १ टक्क्यांनी वाढले की, समाज सच्चा व्हायला लागेल. पण लुच्च्यांच प्रमाण १ टक्यांनी वाढल, तर मात्र कच्चे सगळे लुच्चे व्हायला लागतील.
      
         चला तर सच्च्यांची संख्या फक्त १ टक्क्यांनी वाढवूया समाज सच्चा करूया.
सच्चे होण्यासाठी शुभेच्छा…
ज्ञानसूत डॉ. संजय चाकणे
प्राचार्य, टी जे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय खडकी.
माजी सदस्य, अभ्यासमंडळ, अधिसभा, विद्यापरिषद, परीक्षा विभाग, व्यवस्थापन परिषद सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे.

Related Articles

Back to top button