कृषी

कृषीमंत्री सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी; शेतकऱ्यांशी संवाद साधत दिला दिलासा

श्रीरामपूर : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्रीरामपूर व राहाता तालुक्यात बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेती बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, पुणे येथील विभागीय कृषी सह संचालक रफिक नाईकवडी, जिल्हा अधीक्षक शिवाजी जगताप, उप विभागीय कृषी अधिकारी श्री.नलगे, आत्माचे उपसंचालक श्री. गायकवाड, राहात्याचे तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, श्रीरामपूरचे अशोक साळी आदी उपस्थित होते.

राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असेही कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राहाता तालुक्यातील नांदूर येथे सुखदेव म्हस्के यांच्या द्राक्ष शेतीची तर श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बाळासाहेब ढोकचौळे यांच्या शेतीमधील मका व कांदा पिकाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button