कृषी

कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे- संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख

राहुरी विद्यापीठ : डिजिटल शेतीमध्ये ड्रोन व आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाच्या साह्याने कृषि निविष्ठांचा काटेकोर वापर करून शेतीचे उत्पादन वाढू शकते. त्याचप्रमाणे पाणी, मनुष्यबळ, खते आणि कीटकनाशकांचीही बचत होते. शेतीतील उत्पन्न दुप्पट करण्यासाठी विविध कृषि तंत्रज्ञानाचा वापर, विपणन आणि मूल्यवर्धन इत्यादी बाबींचे शेती करताना नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आणि शेतकऱ्यांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाविषयी जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कृषि शिक्षण प्रकल्प व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथील हवामान अद्यावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत शेतीसाठी ड्रोनचा वापर या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्रातील सर्व कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञांसाठी आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख हे होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तथा कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ.सुनील गोरंटीवार, कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे, कृषि यंत्रे व शक्ती विभागाचे विभाग प्रमुख तथा कास्ट प्रकल्पाचे सदस्य डॉ. सचिन नलावडे व मृदा व जलसंधारण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. प्रमोद रसाळ म्हणाले की, आधुनिक शेतीसाठी ड्रोनचा वापर अनिवार्य झाला आहे. आज शेतीमध्ये करावयाच्या विविध कामांसाठी ड्रोनचा वापर वाढत आहे. कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. मुकुंद शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. सुनील गोरंटीवार यांनी कार्यशाळेची पार्श्वभूमी सांगितली तसेच तसेच शेतीसाठी ड्रोन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. सचिन नलावडे यांनी ड्रोनचे प्रकार, त्यांचा तपशील व कार्यप्रणाली तसेच फवारणीसाठी ड्रोनचा वापर, पूर्व तयारी, वापराच्या पद्धती, काम करताना घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेअंतर्गत विषय विशेषज्ञांसाठी कास्ट प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक डॉ. गिरीशकुमार भणगे यांनी दिले. याप्रसंगी डॉ. कोळसे व डॉ. नंदकुमार भुते यांनी विषय विशेषज्ञांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार उपस्थित होते. यावेळी त्यांच्या शुभहस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी घाडगे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन नलावडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी समन्वयक म्हणून डॉ. गिरीशकुमार भणगे व इंजि. नीलकंठ मोरे यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button