ठळक बातम्या

ऐतिहासिक शहागडावर स्वराज्य व स्वातंत्र्याची सुवर्णभेट

बाळासाहेब भोर | संगमनेर : ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा लाभलेल्या स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीतील शहागडावर स्वातंत्र्यदिनी मोठ्या उत्साहात ध्वजारोहन करण्यात आले. ईगल विंग्ज ट्रेकर्स या टीमच्या सहकार्याने, शहागडाच्या पश्चिमेकडील कड्यावर दोर च्या सहाय्याने सुरक्षेच्या नियमांचे पालन करून भव्य तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 15 ऑगस्ट रोजी पेमगिरीत सकाळी ग्रामपंचायत कार्यालय, माध्यमिक विद्यालय व प्राथमिक शाळेतील ध्वजारोहन संपन्न झाले. शाळेतील विविध कार्यक्रम पार पडल्यानंतर ऐतिहासिक शहागडावर विशाल असा सुमारे दीड हजार स्केअर फूट तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. ध्वजारोहन झाल्यानंतर राष्ट्रगीत व भारतभूच्या घोषणांनी पूर्ण परिसर दुमदुमला. पदोपदी इतिहासाची साक्ष देणाऱ्या या शहागडावर आपल्या वास्तव्याच्या काळात शहाजीराजे यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले होते. व सुमारे तीन वर्ष या गडावरून राज्यकारभार बघितला होता. शहागडावरील या ध्वजारोहनावेळी जणू काही स्वराज्य व स्वातंत्र्याची (भगवा-तिरंगा) गळाभेटच झाली अशीच जाणीव उपस्थित प्रत्येकाला होत होती.

व्हिडिओ पहाऐतिहासिक शहागडावर स्वराज्य व स्वातंत्र्याची सुवर्णभेट

सकाळपासूनच पावसाची सुरु असलेली रिमझिम, थंडगार वारा, पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर ओढलेले डोंगर, खळखळून वाहनारे धबधबे व अशात शहागडावरील अमृत महोत्सव सोहळा याची देही याची डोळा बघावा असाच होता. ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्रकार ऋषी डुबे यांनी या ऐतिहासिक क्षणांचे सुंदर चित्रीकरण केले आहे. निसर्गाने मुक्तहस्तपणे उधळण केलेल्या स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या ध्वजारोहनप्रसंगी पेमगिरी गावाच्या सरपंच द्वारकाताई डुबे, उपसरपंच खंडू जेडगूले, रावसाहेब काका डुबे, कामगार तलाठी सुरेखा कानवडे, पोलीस पाटील मिलिंद टपाल, ग्रामसेवक पाटील, शहागड युवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व पेमगिरीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button