अहमदनगर

आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे व क्रांतिसूर्य आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन

अहमदनगर/ जावेद शेख : भगवान बिरसा मुंडा व क्रांतिवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम बिरसा ब्रिगेड संघटना करत असून आदिवासी समाजाने याकडे जाणते पणाने पाहून चुकीच्या गोष्टी आत्मसात करू नये. तसे केल्यास समाजात फूट पडेल, त्यासाठी जागृत रहा असे आवाहन आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी राजूर येथे बोलताना केले.
आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे व क्रांतिसूर्य आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय जनजाती गौरव दिन अकोले तालुक्यात १३,१४ नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जनजाती कल्याण आश्रम यांच्या वतीने रथयात्रा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राजूर येथे अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे बोलत होते. यावेळी प्रा एस झेड देशमुख यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी सभापती सौ.उर्मिला राऊत, उपसभापती दत्ता देशमुख, सरपंच गणपत देशमुख, भरत घाणे, संतोष बनसोडे, भाजपा अनुसूचित जनजाती चे जिल्हाध्यक्ष विजय भांगरे, पांडुरंग खाडे, संपत झडे, संतोष सोडणार, सुनील सरोक्त, सुरेश गभाले हजर होते.
श्री. पिचड म्हणाले क्रांतीविर राघोजी भांगरे यांचा इतिहास शोधून काढून मी व डॉ. गोविंद गारे यांनी २ मे रोजी ठाणे कारागृहात अभिवादन केले त्यावेळी फक्त १२आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अलीकडे काही संघटना पत्रके काढून आमची संमती नसताना आमचे नाव टाकून क्रांतीवीरांच्या नावाखाली पैसे गोळा करत आहे. समाजात धर्मात फूट पाडण्याचे काम करत आहे. देव देवतांच्या बाबत गैरसमज पसरवून आदिवासी समाजात फूट पाडत असून ते मुळीच सहन करणार नाही येत्या ३० तारखेला राष्ट्रीय स्तरावर बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे श्री. पिचड म्हणाले.
प्रा.एस झेड तथा सोपानराव देशमुख यांनी क्रांतीवीरांचा इतिहास सांगताना देशातील ब्रिटिश घालवून सावकारशाही विरोधात बंड पुकारले त्या क्रांती वीरांचा इतिहास विसरला जात आहे.ज्या बिरसा मुंडा, क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी देव, देश, धर्म शिकवला त्यांचे अनुकरण करण्या ऐवजी त्या विरोधात वागून त्यांच्या आदर्शवत कामावर डाग आणू पाहत आहे. माजी मंत्री मधुकर पिचड हे आदिवासी समाजाचे डॉ.आंबेडकर आहेत त्यांच्यामुळे आदिवासी समाजाला दिशा मिळाली न्याय मिळाला स्वतंत्र बजेट मिळाले क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा इतिहास ज्यांनी जगासमोर आणला त्यांनाच राजकीय खेळी करून डावललण्याचे काम होत असेल तर आदिवासी पुन्हा एकदा संघर्ष करेल असेही ते म्हणाले. रथयात्रा प्रमुख प्रतीक पावडे व अभिषेक वाकचौरे यांनी विशेष प्रयत्न केले. प्रमोद लहामगे व अभिषेक माने यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button