अहमदनगर

अशोकराव कटारे यांना मिळालेला देशभक्ती लेखन पुरस्कार’ प्रेरणादायी – वसंतराव शिंदे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : खा. गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या खैरी येथील न्यू इंग्लिश स्कुलचे शिक्षक अशोकराव भीमनाथ कटारे यांना वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा लाभलेला ‘राज्यस्तरीय देशभक्ती लेखन पुरस्कार ‘ अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे, असे मत इंदिरानगर येथील सेवानिवृत्त अभियंते वसंतराव शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त निबंध, कविता, लेख, पुस्तक परीक्षण, चिंतन लेखन असे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमात अशोकराव कटारे यांनी ‘देशभक्ती आणि स्वातंत्र्य ‘ या विषयावर लिहिलेला लेख सर्वोत्कृष्ट ठरला. त्याबद्दल अशोकराव कटारे यांचा वसंतराव शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भीमनाथ कटारे, संगीता फासाटे /कटारे उपस्थितीत होते. यावेळी संगीता फासाटे यांचाही सत्कार करण्यात आला.
वसंतराव शिंदे आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, अशोकराव कटारे एक आदर्श शिक्षक आहेत. त्यांनी आपल्या कलागुणांचा असाच विकास करावा. संगीता फासाटे ह्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवयित्री आहेत, त्यांना मिळालेले सन्मान सर्वांना प्रेरणा देणारे आहेत, असे कौतुक केले. अशोकराव कटारे आणि संगीता फासाटे यांनी आपल्याला मिळालेले सन्मान हे आनंद आणि प्रेरक ठरणारे आहेत, असे सांगितले. अशोकराव कटारे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button