अहमदनगर

पत्रकार महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा राहुरीतील पत्रकारांकडून निषेध

राहुरी | अशोक मंडलिक : पाचोरा, जि. जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्याची सखोल चौकशी करून या मागील सूत्रधारांविरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांना देत निषेध नोंदविला आहे.

सदर निवेदनात म्हटले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांच्यावर बुधवारी भ्याड हल्ला करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी दिलेल्या एका बातमीवरून संतापलेल्या आ. किशोर पाटील यांनी अत्यंत अर्वाच्च, शिवराळ भाषेत महाजन यांना शिवीगाळ केली. त्याचं रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर उभा महाराष्ट्र नि:स्तब्ध झाला होता. एक लोकप्रतिनिधी, आमदार एवढी शिवराळ भाषा कशी वापरू शकतो ? असा प्रश्न महाराष्ट्राला पडला आहे. किशोर पाटील यांनी केवळ शिव्याच दिल्या नाहीत तर महाजन यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. हे सारं संतापजनक आणि निषेधार्ह आहे.

काही गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला. तो व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल झाला आहे. ज्या गुंडांनी महाजन यांच्यावर हल्ला केला ते देखील नेहमी किशोर पाटील यांच्याबरोबर असतात असा संदीप महाजन यांचा आरोप आहे. आरोपींचे आणि किशोर पाटील यांचे मोबाईल संभाषण तपासले तर हा किशोर पाटील यांचाच कट असल्याचे दिसून येईल असाही संदीप महाजन यांचा आरोप आहे.

यावेळी जेष्ठ पत्रकार रमेश बोरुडे, गणेश विघे, विनित धसाळ, रियाज देशमुख, मनोज साळवे, गोविंद फुणगे, संतोष जाधव, आकाश येवले, अशोक मंडलिक आदी पत्रकार उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button