राजकीय

पंचायत समिती सभापतीपदासाठी निवडणूक प्रकिया पूर्ण; निकाल राखीव

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : श्रीरामपूर पंचायत समिती सभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात न्यायालयाच्या निर्देशानुसार व नियमानुसार पूर्ण करण्यात आली. सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे निवडणुकीचा निकाल हा राखीव ठेवण्यात आल्याचे व दि. २४ नोव्हेंबरपर्यंत जाहीर करणार नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली. सभापती पदासाठी अर्ज तयार करणे, सूचक अनुमोदक आदी प्रक्रिया श्रीरामपूर आ. लहू कानडे यांच्या कार्यालयात पूर्ण करण्यात आल्यानंतर सभापतीपदाचे उमेदवार डॉ वंदनाताई मुरकुटे मान्यवरांसह, समर्थकासह पंचायत समिती कार्यालयात आले व डॉ वंदनाताई मुरकुटे यांनी आपला सभापती पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला. हे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या महिला प्रबल उमेदवार डॉ वंदनाताई मुरकुटे ह्या होत्या. पंचायत समिती माजी सभापती संगीता शिंदे यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. या सर्व प्रक्रियेतून गेल्यावर जिल्हाधिकारी यांनी ९ नोव्हेंबर रोजी या पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्याला विखे गटाचे माजी सभापती दीपक पटारे यांनी आव्हान दिले. या प्रकरणी खंडपीठाने १८ नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक प्रक्रिया घेण्यास मान्यता देत निकाल जाहीर करण्यास मात्र मनाई केली. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रकिया निर्णय अधिकारी अनिल पवार व गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस यांच्या उपस्थितीत पार पडली.

यावेळी काँग्रसच्या वतीने वंदना मुरकुटे यांनी दोन व विखे गटाच्या वतीने कल्याणी कानडे, वैशाली मोरे यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केले. कल्याणी कानडे यांच्या वतीने विधिज्ञ आर डी जोंधळे, तर वैशाली मोरे यांच्या वतीने विधिज्ञ एस बी काकडे यांच्या मार्फत पंचायत समितीत ५० टक्केपेक्षा अधिकचे आरक्षण असून इतर मागासवर्गीय २७ टक्के आरक्षणाची मर्यादा असताना त्यापेक्षा अधिक आरक्षण दिलेने सदरचा उमेदवारी अर्ज ग्राह्य धरावा असा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना दिला. सदरचे दोन्ही अर्ज अन्य प्रवर्गातील उमेदवार असून हे इतर मागास महिला प्रवर्गाचे नसल्याने ते दोन अर्ज अवैध ठरविण्यात आले. तर वंदना मुरकुटे ह्या इतर मागास प्रवर्गातून निवडून आल्या असून त्यांनी जातीच्या दाखल्यासह सर्व कागद पत्रांची पूर्तता केली आहे. त्यामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला असल्याचे निवडणूक अधिकारी यांनी सांगितले. आरक्षित पदाकरिता एकच सदस्य पात्र असल्याने मतदानाची गरज पडली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना विखे गटाचे माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, जि.प.सदस्य शरद नवले, उपसभापती बाळासाहेब तोरणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, संदीप शेलार, वैशाली मोरे, कल्याणी कानडे, तसेच कॉंग्रेसच्या वतीने इंद्रनाथ थोरात, अशोक कानडे, ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक, विजय शिंदे, विजय मोरे, समीन बागवान आदी उपस्थित होते.

विरोधकांनी रडीचा डाव खेळला त्यांच्या प्रतिष्ठेपायी एक महिला अपात्र ठरली. कॉंग्रेसच्या उमेदवाराला चोरून सभापती पदावर बसविले व लगाम आपल्या हातात ठेवला. त्यांचे पद गेले तरी मी सभापती होऊ नये म्हणून प्रयत्न केले. ही लोकशाहीची गळचेपी आहे. सत्याचा पराजय करण्याचा प्रयत्न झाला. माझ्या पाठीशी श्रीकृष्ण आहे. बाकींच्याकडे सैन्य आहे. माझ्या या कामात ज्ञानेश्वर मुरकुटे, आ.लहू कानडे, आ.डॉ सुधीर तांबे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आपल्या यशाचे शिल्पकार आहेत, अशी प्रतिक्रिया डॉ वंदना मुरकुटे यांनी दिली. तसेच दोन अर्ज अवैध ठरविल्याने त्या बाबतचे अपील उच्च न्यायालयात करणार असल्याचे दीपक पटारे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button