कृषी
हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या डाळिंब बागांना भेटी व मार्गदर्शन
राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) अंतर्गत, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक तथा हॉर्टसॅप समन्वयक डॉ. संजय कोळसे व संशोधन सहयोगी डॉ. नंदलाल देशमुख समवेत महाराष्ट्र शासनाच्या अहमदनगर जिल्हयातील कृषि विभागाचे अधिकारी यांनी अहमदनगर, राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील किडी व रोग आर्थिक नुकसान पातळीच्या वर गेलेल्या गांवामधील डाळिंब बागांना भेटी दिल्या.
रोग व किडी आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेल्या अहमदनगर तालुक्यातील नेप्ती, राहुरी तालुक्यातील वांबोरी, मोकळओव्हळ, गुहा, तांभेरे व श्रीरामपुर तालुक्यातील पढेगाव, वळदगाव, बेलापूर बुद्रक या गावांमधील कृषि विभागाचे प्रक्षेत्र अधिकारी यांच्या समवेत हॉर्टसॅप योजनेअंतर्गत डाळिंबाच्या निवडलेल्या प्लॉटला भेटी दिल्या. अनेक गांवातील डाळिंब प्लॉटच्या पाहाणीदरम्यान असे निदर्शनास आले की, काही बागांची फळे तोडणी सुरु आहे, तसेच काही बागांची तोडणी पुर्ण झालेली आहे. यामध्ये बर्याच बागांमध्ये मर रोग, फळांवरील ठिपके, तेल्या रोग तसेच फुलकिडे व फळ पोखरण्यार्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
पहाणी दरम्यान असेही निदर्शनास आले की, लागवडीतील अंतर खुप कमी असलेल्या बागांमध्ये रोग व किडींचा प्रादुर्भाव जास्त दिसून आला. यामध्ये काही बागा पुर्ण:त तणाने व्यापलेल्या तसेच काही बागांची फळ तोडणी पुर्ण झाल्यानंतर किड व रोगग्रस्त, नाशवंत फळे व फांदया तश्याच बागेत पडलेल्या दिसून आल्या. त्याबाबतील शेतकर्यांना रोगट फळे, फांद्या नष्ट करणे, तणविहरित बाग ठेवणे इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या सर्वेक्षण व मार्गदर्शन मोहिमेमध्ये अति प्रादुर्भाव झालेल्या बागांची पाहाणी करुन शास्त्रज्ञांनी डाळिंब बागेमध्ये प्रादुर्भाव झालेल्या किड व रोगाच्या एकात्मिक व्यवस्थापणासाठी सविस्तर मार्गर्शन करुन शेतकर्यांच्या शंकाचे निरसण देखील केले. सदर मोहिम ही महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.