महाराष्ट्र

स्वच्छ सर्वेक्षणात देवळाली प्रवरा नगरपरिषदेस दोन मानांकने

राहुरी शहर/अशोक मंडलिक : स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून स्वच्छ सर्वेक्षण 2021 घेण्यात आले होते. त्याचा पुरस्कार सोहळा 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन, दिल्ली येथे होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये देशातील ४२४२ शहरांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील महानगर पालिका, नगरपरिषद व नगरपंचायती असलेल्या अशा २२ शहरांना पारितोषिके मिळाले आहेत व त्यात देवळाली प्रवरा नगरपरिषदेस स्वच्छ सर्वेक्षण 2021 स्वच्छ शहर व कचरा मुक्त शहर असे दोन मानांकन मिळाले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या संयुक्त सचिव व अभियान संचालिका रूपा मिश्रा यांनी या पुरस्काराबाबत पत्राद्वारे कळविले असल्याची माहिती नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.
दरवर्षी केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाकडून संपूर्ण भारतभर स्वच्छ सर्वेक्षण राबविले जाते. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये संपूर्ण देशातुन ४२४२ शहरांनी भाग घेतला होता त्यात महाराष्ट्रातून ३९५ शहरांनी भाग घेतला होता. स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये महाराष्ट्रातील २२ शहरांना स्वच्छ शहर असे मानांकन मिळाले आहेत. त्यामध्ये देवळाली प्रवरा शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये स्वच्छ शहर व कचरामुक्त शहर असे दोन मानांकन मिळाले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून स्वच्छ सर्वेक्षण २०२१ या सर्वेक्षणात भाग घेण्यास व परीक्षणास सुरुवात झाली होती. या सर्वेक्षणाचे स्वरूप तीन तिमाहीत (क्वार्टर) करण्यात आले होते. यामध्ये एकूण स्पर्धा ६००० गुणांची होती तर त्यामध्ये शहरात असलेले नागरिकांसाठी स्वच्छतेच्या सुखसोयी शौचालये, मुताऱ्या व इतर सुविधा, सांडपाणी गटारी, विलगीकरणासह कचरा संकलन, वाहतूक, पुन्हा विलगीकरण तपासणी, त्यावर प्रक्रिया, हागणदारी मुक्त शहर मानांकन प्रशस्तिपत्रक,नागरिकांचा सहभाग असे अनेक कागदपत्रांच्या पूर्ततेसह उपलब्ध असलेल्या सुविधांवर आधारित या वेगवेगळ्या विषयावर गुणांचे विभाजन केलेले होते. याचे प्रत्यक्ष परीक्षण गेल्या मार्च मध्ये केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या निरीक्षक पथकाद्वारे करण्यात आले होते. हागणदारीमुक्त शहर ODF++ मानांकन व कचरामुक्त शहर हे दोन मानांकन मिळाले आहे.
महाराष्ट्रातून ३९५ शहरांनी भाग घेतला होता त्यापैकी आपल्या देवळाली प्रवरा शहरासह विटा, लोणावळा, सासवड, महाराष्ट्र्र राज्य, नवीमुंबई, पुणे, बृहन्मुबई, कऱ्हाड, हिंगोली, खोपोली, कामटी, पाचगणी, तेवसा, पन्हाळा, मुरगूड, धानोरा, पनवेल, बद्रावती, मूळ, दोंडाईचा व खानापूर अशा २२ शहरांना मानांकने मिळाली आहेत. त्याचे मानांकन/पुरस्कार वितरण सोहळा येत्या २० नोव्हेंबरला महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद याच्या शुभहस्ते व गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे मंत्री हरदीपसिंग पुरी आणि स्वच्छ भारत मिशनच्या सचिव रूपा मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थित होणार असल्याचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले आहे.
नाशिक विभागातून देवळाली प्रवरा व दोंडाईचा या फक्त दोनच शहरांना हे मानांकन मिळाले आहे. यापुढे देखील देवळाली शहरात भूमिगत गटार व मलनिस्सारण हा प्रकल्प रावबिला जाणार असल्याने याचा नक्कीच येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये मोठा फायदा होईल. यापुढे देखील शहर सातत्याने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये भाग घेत राहील व हे मानांकन नागरिकांच्याच सहकार्याने मिळाले असल्याने मी शहरातील सर्व नागरिकांचे विशेष अभिनंदन करतो व आभार मानतो. त्याशिवाय स्वच्छतेत प्रत्यक्ष काम करणारे सर्व कर्मचारी, अधिकारी व मुख्याधिकारी व सर्व सहकारी नगरसेवक यांचे आभार मानतो असे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले.
आपल्या शहराला कचरा मुक्त शहर व स्वच्छ शहर मानांकन मिळाल्याचे संपूर्ण श्रेय शहरवासीयांना जाते. कारण त्यांनी सहकार्य दर्शविल्याने हे मानांकन आपल्याला मिळू शकले व कदाचित आम्ही कमी पडत असू परंतु आपल्या सहकार्याने देशात सर्वोत्तम स्वच्छ शहर पुरस्कार मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
_नगराध्यक्ष सत्यजित कदम
नागरिकांच्या सहकार्याने हे यश प्राप्त झाले आहे, मी नागरिकांचे व सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते व आभार मानते. यापुढे हि असे सहकार्य करून आपल्या शहराचे नाव देशात प्रथम क्रमांकावर न्यावे असे आव्हान करते.
_मुख्याधिकारी नेहा भोसले IAS (भाप्रसे)

Related Articles

Back to top button