अहमदनगर

कास्ट प्रकल्पाच्या सहाय्याने डिजिटल तंत्रज्ञानाने समृद्ध बनलेली गावे इतरांना आदर्श ठरतील : उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल

राहुरी विद्यापीठ : विद्यार्थ्यांनी त्यांच्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकसित करून रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न करावेत. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी संगणकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वताला जास्तीत जास्त अपग्रेड केल्यास विद्यापीठाचे मानांकन सुधारण्यास त्याचा फायदा होईल. पंतप्रधानांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत तेव्हाच बनेल जेव्हा जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान तयार करून वाजवी दरात देशातील सर्वांपर्यंत ते पोहोचेल. आम्हाला लहान शेतकऱ्यांनाही सहज वापरणे योग्य असे तंत्रज्ञान बनवावे लागेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या सहकार्याने डिजिटल तंत्रज्ञानाने समृद्ध बनलेली गावे इतरांना आदर्श ठरतील असे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाचे संचालक व कृषी शिक्षणाचे उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल यांनी केले. 

राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठात कार्यरत असून या प्रकल्पाला भेट दिल्यानंतर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अग्रवाल बोलत होते. यावेळी कास्ट प्रकल्पाचे अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्पाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रभात कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संचालक संशोधन तथा विस्तार शिक्षण डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, हळगावच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, कुलगुरूंचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद डोके उपस्थित होते. 

डॉ. प्रभात कुमार या वेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की स्मार्ट तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वापर करण्यासाठी ते प्रथम वापरण्यास सहज सोपे बनविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेली उपकरणे ही भविष्यात क्रांतिकारी ठरतील. शेती करण्यासाठी लागणाऱ्या संसाधनांवरील खर्च कमी होणे गरजेचे आहे. लहान-सहान शेती कामासाठी उपयोगी पडणारे साधन यंत्र वापरण्यायोग्य बनवून भारतीय शेती टिकविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल. संसाधनांचा, नवनवीन उपकरणांचा शेतीत वापर करताना कार्बनची निर्मिती कमीत कमी कशी होईल याकडे लक्ष द्यावे लागेल. पाण्याचा काटेकोर वापर करताना भविष्याच्या दृष्टीने पाण्याचा एक थेंब सुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे.


कुलगुरू डॉ. पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पंतप्रधानांनी सांगितलेल्या आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कास्ट सारख्या प्रकल्पांची मदत होणार आहे. विद्यापीठात शिकणाऱ्या मुलांना या प्रकल्पामुळे परदेशी जाऊन शिकण्याची संधी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या मदतीने तयार केलेली मोबाईल ॲप्स, फुले शेड्युलरसारखे तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. 

यावेळी डॉ. शरद गडाख यांनीही मार्गदर्शन केले. मान्यवरांनी यावेळी आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. कास्ट प्रकल्पाचा आढावा प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरटीवार यांनी सादर केला. डॉ. मिलिंद अहिरे यांनी आभार तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. जी. शिंदे यांनी केले. यावेळी सर्व विभाग प्रमुख, कास्ट प्रकल्पातील सर्व कास्ट मेंबर व संशोधन सहयोगी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या पूर्वी मान्यवरांनी कास्ट – कासम प्रकल्पाद्वारे तयार केलेल्या नावीन्यपूर्ण अविष्कारांची पाहणी केली. यामध्ये स्पेसिफिक स्लरी ॲपलिकेटर, फुले रोबो, व्हेजिटेबल ट्रान्सप्लांटर , आय. टी. ओ. प्रोमीटर, पी. आय. एस. सेंसर, ड्रोन प्रयोगशाळा, रोबोटिक प्रयोगशाळा, हायपर स्पेक्ट्रोनिक इमेजिंग लॅब, माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा, आयटी प्रयोगशाळा, मल्टी प्लॉट सोलो नाईट सिस्टीम या आविष्कारांचा समावेश होता. यावेळी डॉ. सुनील गोरटीवार, डॉ. सचिन नलावडे, डॉ. सुनील कदम, डॉ. रवी आंधळे, डॉ. पवन कूलवाल, डॉ. एम.जी. शिंदे, डॉ. अतुल अत्रे, डॉ. उल्हास सुर्वे व सेवा संस्थेचे संचालक इंजि. उमेश लगड यांनी या सर्व अविष्कारासंबंधीची माहिती मान्यवरांना यावेळी दिली. तसेच कास्ट प्रकल्पाचे हवामान अद्ययावत प्रक्षेत्र व हवामान अद्ययावत डिजिटल गाव बाबुर्डी घुमट याठिकाणी भेट दिली. यावेळी कास्ट प्रकल्पाद्वारे राबविण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्र आणि स्वयंचलित पंप प्रणालीस भेटी प्रसंगी बाबुर्डी घुमटचे सरपंच श्री. जनार्दन माने यांनी मान्यवरांचे स्वागत करून सत्कार केला व गावाविषयी माहिती दिली. यावेळी मान्यवरांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button