धार्मिक

पेमगिरीतील दत्त मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

संगमनेर | बाळासाहेब भोर : ऐतिहासिक व नैसर्गिक वैभवप्राप्त स्वराज्य संकल्प भूमी पेमगिरीतील दत्त मंदिरात दि. 23 ते 30 डिसेंबर रोजी अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीही महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या कीर्तनसेवेचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

गेली बेचाळीस वर्षांपासून सुरु असलेला हा भगवान दत्तात्रेयांचा अखंड हरीनाम सप्ताह म्हणजे पंचक्रोशीतील भाविकांसाठी मोठी पर्वनीच असते. वै.अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांच्या आशिर्वादाने तसेच वारकरी संप्रदयातील महामेरू गुरुवर्य ह.भ.प. मनोहर महाराज भोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ह.भ.प. हौशीराम महाराज कोल्हे यांच्या सूत्रसंचालनाखाली हा नामयज्ञ 43 व्या वर्षात पदार्पण करत आहे.

वारकरी संप्रदायला आपला आधार मानणारे गुरुवर्य ह.भ.प. मनोहर महाराज भोर यांच्या प्रयत्नांमुळेच या ठिकाणी ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लहवितकर, ह.भ.प. सुमंत महाराज नलावडे, ह.भ.प. जगन्नाथ महाराज पवार, ह.भ.प.दयानंद महाराज कोरेगावकर, ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांच्या सारख्या नामवंत कीर्तनकरांची कीर्तनसेवा दत्त मंदिर मळा याठिकाणी प्राप्त झाली आहे.

गीता जयंती, दत्त जयंती आणि वै.अच्छानंद बाबा ब्रह्मचारी यांची पुण्यतिथी असा त्रिवेणी संगम हा या नामज्ञाचा विशेष महिमा आहे. सायंकाळी सात ते नऊ या वेळेत कीर्तनसेवा आयोजित केली असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम अशी या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. तसेच दत्त जयंतीच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिन सोहळा याची देही याची डोळा बघावा असा खुप भव्यदिव्य स्वरूपात साजरा होत असतो. विशेष म्हणजे दत्त मंदिर परीसरातील सर्व तरुण वर्ग हा सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तन, मन, धनाने या धार्मिक कार्यात सहभागी असतात.

यावर्षी दि.23 ते 30 डिसेंबर रोजी रात्री 7 ते 9 या वेळेत अनुक्रमे ह.भ.प. गोविंद महाराज करंजकर (आंबेजोगाई), ह.भ.प. लक्ष्मण महाराज मोरे (नाशिक ), ह.भ.प. अमोल महाराज वाकळे (आळंदी), ह.भ.प. मनोहर महाराज भोर (अंबड), ह.भ.प. एकनाथ महाराज सदगीर (ठाणे) , ह.भ.प. नामदेव महाराज वाळके (पेठ ), ह.भ.प. हौशीराम महाराज कोल्हे (पेमगिरी ) या नामवंत कीर्तनकरांची कीर्तनसेवा संपन्न होणार आहे.

या सप्ताहाची सांगता शनिवार दि. 30 डिसेंबर 2023 रोजी ह.भ.प. परमेश्वर महाराज जायभाये यांच्या गोपाळ काल्याच्या कीर्तनाने होणार असून पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी या कीर्तनरुपी सेवेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, अशी विनंती गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button