ठळक बातम्या

शाळकरी मुलींना त्रास, विकृत आरोपीवर गुन्हा दाखल; मूलींना त्रास दिल्यास कडक कारवाई, संबंधित पालक, मुलींनी थेट संपर्क करावा- पो. नि.दराडे

बाळकृष्ण भोसले | राहुरी – शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनींना रस्त्यात अडवून अश्लील वर्तन करत सतत त्रास देणे व या गोष्टीचा जाब विचारल्याने तिच्या घरच्यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी राहुरीत या विकृत आरोपीविरोधात विनयभंग, मारहाण, बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान राहुरीचे पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांनी अशा घटनांची गंभीर दखल घेत तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यानींना थेट भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येवले आखाडा येथील हा आरोपी शाळेत जात असलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्यींनींचा सतत पाठलाग करून त्यांना माझ्याशी संबंध ठेवं. तिच्या घरासमोरून सतत चकरा मारुन फोन नंबर मागत, वारंवार त्रास देत होता. त्यामुळे महिन्यापासून सदरच्या विद्यार्थ्यींनीने शाळेत जाणे बंद केले होते. शाळेत ही विद्यार्थ्यींनी येत नसल्याने त्याने तिच्या घरी चकरा मारणे सुरु केले होते. याचा जाब मुलीच्या नातेवाईकांनी विचारला असता त्यांना मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली, वगैरे फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशा रोडरोमीयोंचा बंदोबस्त करण्यासाठी तालुक्यात मोहिम उघडली आहे. त्यानुषंगाने तालुक्यातील कोणत्याही शाळेत अथवा रस्यावर शाळेत जाता-येताना मुलींना कुणी असे टारगट रोडरोमीयो त्रास देत असतील तर त्यांनी तात्काळ पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांच्या वैयक्तिक व्हाट्सअप क्रमांक 8208136199 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. अशा मुलींचे नाव गुप्त ठेवत रोडरोमीयोंविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.   
रोडरोमीयोंच्या त्रासाने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील मुलींना शाळा बंद करण्याची वेळ आली आहे. पालक या टारगट रोडरोमीयोंना विरोध करण्याऐवजी नको त्या भानगडी आपल्याच मुलीची नालस्ता होईल म्हणून मुलींना शाळेतून काढून घेतात. म्हणून अशा प्रवृत्ती समाजात फोफावत आहेत. तेंव्हा आता पोलिस निरिक्षक दराडे यांनी अशा घटनांना आळा बसावा म्हणून उचललेल्या या कारवाईचे तालुक्यातील तमाम पालकवर्गातून कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button