अहमदनगर

राहुरी महाविद्यालय येथे जादुटोणा विरोधी कायदा व अंधश्रध्दा निर्मूलन कार्यशाळा संपन्न

राहुरी : सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अहमदनगर, बार्टी समतादूत प्रकल्प, अहमदनगर व लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मुलन व जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे हे होते तर मार्गदर्शक म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समिती सदस्य तथा सावित्रीबाई फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक अरूण तुपविहीरे तसेच बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, राहुरी महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ.अनिता वेताळ, विना अनुदानित वसतिगृह संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब भोईटे उपस्थित होते.

राहुरी तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठाचे मुख्याध्यापक अरुण तुपविहीरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होऊन अंधविश्वास दूर करण्याकरिता अनेक भोंदू बाबा करत असलेल्या प्रयोगामागील कार्यकारण भाव समजावून सांगितला. यामध्ये अखंड अमृत कलश, अदृश होणारी पेन्सिल, रंग बदलणारी वही, पाकिटातील लिहलेली गोष्ट ओळखणे असे विविध प्रयोग करताना विद्यार्थ्यांची जिज्ञासा कुतुहल वाढवत शेवटी जादू मागील कार्यकारण भाव सहजपणे समजावून सांगितला. या जादुच्या प्रयोगाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जादूटोणा विरोधी कायदा जनसामान्य लोकांपर्यंत पोहचावा यादृष्टीने सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे व बार्टीचे विभाग प्रमुख डाॅ सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्ह्यात तालुका स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी राधाकिसन देवढे यांनी उपस्थितांना जादूटोणा कायद्याबाबत लोकांनी जागृत होऊन अंधश्रध्देला बळी न पडता अश्या चुकीच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जागरूक व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे. जेणेकरून अघोरी प्रकारातुन दुर्घटना होणार नाही व अशा गुन्हेगारांना कायद्याचा धाक बसेल यादृष्टीने प्रयत्न करण्याचा मोलाचा सल्ला दिला.

हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रा.अनिरुद्ध जाधव, प्रा.जाधव ए बी, डाॅ. देशमुख प्रतिक्षा, प्रा.डाॅ थोरात व्ही टी, प्रा.घोलप पी.एस, प्रा.ढेरे सचिता, प्रा मोनिका पवार, बार्टीचे समतादूत पिरजादे एजाज, महाविद्यालय समान संधी केंद्र, एनएसएस विभाग, कमवा व शिका योजना विद्यार्थी यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन बाबत सुंदर असे पथनाट्य सादरीकरण केले व विविध भित्तीपत्रके व्दारे जनजागृती करण्यात आली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button