अहमदनगर

श्रीरामपूरची साहित्य चळवळ आदर्शवत – प्रा.डी.ए.माने

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठान, साहित्य प्रबोधन मंच, साहित्य परिवार, वाचनालय आणि इतर साहित्यनिर्मिती, उपक्रम हे श्रीरामपूर शहराचे भूषण असून डॉ. बाबुराव उपाध्ये आणि त्यांचा मित्र परिवार ही साहित्य चळवळ प्रामाणिकपणे पुढे नेत आहेत हे आदर्शवत आहे, असे मत सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक आणि साहित्यिक प्रा.डी.ए.माने यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे गुरुवर्य प्रा.डी.ए. माने यांच्या समर्पित जीवनकार्याचा आणि हाती घेतलेल्या चरित्रलेखन उपक्रमाचा सार्थ गौरवात्मक,  अभिनंदन प्रीत्यर्थ सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रा. माने बोलत होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये आणि सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी प्रा. माने यांचा शाल, बुके आणि अनेक पुस्तके देऊन सन्मान केला. प्रा.माने आपल्या मनोगतात म्हणाले, श्रीरामपूर येथे दोन दिवसाच्या मुक्कामात अनेकांनी केलेले सन्मान हे मला लाखमोलाचे आहेत. प्राचार्य डॉ.के.एच.शिंदे, माजी प्राचार्य टी.ई.शेळके, माजी प्राचार्य डॉ.शन्करराव गागरे, विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे सुखदेव सुकळे, साहित्य प्रबोधन मंच अध्यक्ष डॉ.शिवाजी काळे, साहित्य परिवारचे कवी प्रा.पोपटराव पटारे, कवयित्री संगीता फासाटे, आरोग्यमित्र भीमराज बागुल, पत्रकार बाबासाहेब चेडे, प्रा.शिवाजीराव बारगळ इत्यादींनी केलेले सन्मान, दिलेली पुस्तके, आयोजित व्याख्यपर उपक्रम मला जीवनप्रेरणादायी आहेत.
प्रा.माने हे 1960 साली बोरावके कॉलेजला पहिले प्राचार्य असलेले कै.शन्करराव कृष्णाजी उनउने यांचे चरित्र लेखन करीत आहेत, त्यासाठी चरित्र साधनांचा ते शोध घेत आहेत, प्रा.माने यांच्या या कार्याला श्रीरामपूरमध्ये साहित्यिकांतर्फे अभिनंदन करून त्यांना  शुभेच्छा देण्यात आल्या. प्रा.डी.ए.माने हे रयत शिक्षण संस्थेत मराठीचे नामवंत प्राध्यापक होते. श्रीरामपूर येथे बोरावके महाविद्यालय आणि चंद्ररूप डाकले वाणिज्य महाविद्यालयात 1977 ते 1981 या काळात ते प्राध्यापक होते. श्रीरामपूरची जडणघडण त्यांनी जवळून अनुभवली आहे. याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला.
डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी सेवानिवृत्तीप्रसंगी ऋणानुबंध जपत बोरावके कॉलेजगेटसाठी 2 लाख 51 हजार रुपयांची मोठी देणगी दिली, त्याबद्दल प्रा.माने यांनी डॉ.उपाध्ये यांच्याबद्दल कौतुक केले. उपाध्ये हे 1977 ते 1981 या काळात विद्यार्थी होते. पोरक्या वाटेवर त्यांनी कमवा आणि शिका योजनेतून कसे शिक्षण घेतले. अशा आठवणी सांगत डॉ.उपाध्ये आणि साहित्यिक मित्रपरिवार प्रेरणादायी साहित्य चळवळ चालवत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ.उपाध्ये यांनी आदर्श गुरुवर्य प्रा.माने यांनी दिलेला आधार आणि प्रेरणा याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. गणेशानंद उपाध्ये यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button