अहमदनगर

दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा- राजु आढाव

चिंचोली/बाळकृष्ण भोसले : अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील कसारे या गावातील अनु.जातीतील महेश आण्णासाहेब बोराडे हे मताधिक्याने निवडून येवून संविधानाने दिलेल्या हक्कानुसार त्या गावचे सरपंच झाले. याचा राग मनात धरून गावातील जातीयवादी व्यक्ती कृष्णाजी सूर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले यांनी जातीयवादी मानसिकतेतून महेश बोराडे यांना रस्त्यात आडवून सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या गळ्यात तुटक्या जुन्या चपलांचा हार घालून आम्ही तुमचा याच पद्धतीने सत्कार करत असतो म्हणून त्याला आपमानीत करून बहिणीला मारहाण करून निघून गेले व बोराडे कुटुंबावर खोटा दरोड्याचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा जाहिर निषेध करून रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा व संगमनेर तालुका शाखेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजू आढाव यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डाॅ शशिकांत मंगरूळे व उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना निवेदन देऊन खोटा गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी निवेदन देत करण्यात आली.


याबाबत निवेदनात म्हटले आहे की संगमनेर तालुक्यातील कसारे या गावातील ग्रामपंचायतीची सहा महिन्यांपूर्वी निवडणूक झाली आणि सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जातीच्या व्यक्तीसाठी जाहीर करण्यात आले. त्यानुसार महेश बोराडे हे मताधिक्याने निवडून आल्याने संविधानाने घालून दिलेल्या नियमानुसार बोराडे हे त्या गावचे सरपंच झाले. हे गावातील काही जातीयवादी मानसिकतेच्या विघ्नसंतोषींना त्याचे नेतृत्व मान्य नव्हते. त्याचा राग दि २६ आक्टोबर रोजी महेश यांची लहान मुलगी आजारी असल्याने बहिणीला सोबत घेऊन तळेगाव येथील दवाखान्यात घेऊन जात असताना वरील दोघांनी रस्त्यावर गाडी अडवून खाली उतरून महेश बोराडे यांच्या गळ्यात चपलांचा हार घालून आम्ही तुमच्या जातीचा असाच सत्कार करतो. बहीण मध्ये पडली तर तीला मारहाण करून तुला काय वाकडे करायचे ते कर म्हणून निघून गेले. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामध्ये अडवून अपमानित केले.

अचानक घडलेल्या प्रकारा बाबत मुलीला दवाखान्यात न नेता घरी सोडले व संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गेले असता पोलीसांनी देखील अपमानित करून पाच तास फिर्याद घेतली नाही. काही कार्यकर्ते आल्यानंतर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पोलीसांनी समोरच्यांना बोलावून घेऊन आरोपींशी संगनमत करून फिर्यादीवर भादंवि ३९४ प्रमाणे दरोड्या सारखा गंभीर गुन्हा बोराडे कुटुंबावर दाखल करण्यात आला. वरील दोन्ही अरोपींना अटक करून महेश बोराडे यालाही अटक करण्यात आले. ज्यांच्यावर संरक्षण करण्याची जबाबदारी आहे त्यांनीच अधिकाराचा दुरुपयोग करून कोणतीही शहानिशा न करता दरोड्या सारखा तथाकथित खोटा गंभीर गुन्हा दाखल करून सदर कुटुंबाचे जिवनच उध्वस्त करण्याचे कट कारस्थान केले व दलित पिडीतांचा आवाज दाबून बोराडे कुटुंबांना नुकसान पोहचविण्याच्या दुष्ट हेतुने हेतु पुरस्सर जातीयवादी मानसिकतेतून केलेल्या संगमनेर तालुका पोलिसांच्या घृणास्पद कृत्याचा जाहीर निषेध करून वरील आधिकारी यांना निवेदन देऊन सदरच्या खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून तो तात्काळ रद्द करण्यात यावा. तसेच संबंधित दोषीं पोलीस निरीक्षक व पोलीसांवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करून जातीय तेढ दुर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजू आढाव, जिल्हा उपप्रमुख भरतजी भांबळ, गंगानाना विधाटे, संगमनेर तालुका प्रमुख संदीप मोकळ, महासचिव बच्चन भालेराव, शहरप्रमुख देविदास बैरागी, राहुरी युवक प्रमुख विनोद पवार, अमोल शेळके, चांगदेव पराड, अरूण बागुल, अमोल पराड, प्रदीप मोकळ, रविंद्र पराड आदी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button